
मंत्रालयातील नादुरुस्त झालेल्या फेशिअल रेकग्निशन सिस्टममधील बिघाड दूर करण्यात आले आहेत. तब्बल 41 कोटी रुपये खर्च करून ही यंत्रणा मंत्रालयात बसवण्यात आली आहे. पण ही यंत्रणा नादुरुस्त झाल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य प्रशासनाने ही यंत्रणा तातडीने पूर्ववत केली.
मंत्रालयातल्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने फेशिअल रेकग्निशन सिस्टीम मंत्रालयाच्या सर्व महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर बसवली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद पडली होती. मंत्रालयातील पोलीस नियंत्रण कक्षाबाहेरील फेस स्कॅनर बंद पडला होता. ओव्हल मैदानाकडील आरसा गेटवर मंत्रालयात प्रवेश केल्यावर पुन्हा फेस स्कॅनिंग करावे लागते. पण हा फेस स्कॅनर तुटला होता. त्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची राज्य प्रशासनाने त्वरीत दखल घेतली आणि तुटलेला फेस स्कॅनर नव्याने बसवला तर पोलीस नियंत्रण कक्षाबाहेरील बंद पडलेल्या यंत्रणेतील बिघाड दूर केला. त्यामुळे ही यंत्रणा पूर्ववत सुरू झाली आहे. या प्रकल्पाचे काम व वार्षिक देखभाल करण्यासाठी तब्बल 41 कोटी 75 लाख 5 हजार 634 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.



























































