वेधक – निस्वार्थ भावनेतून आरोग्यसेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारा डॉक्टर वर्ग सध्या दुर्मिळ होत चालला आहे. परंतु म्हणतात ना काही चांगल्या लोकांमुळे जग चालते, तसेच लातूर जिह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेणारे डॉक्टर म्हणून परिचित आहेत ते डॉक्टर अशोक पोद्दार. आजपर्यंत त्यांनी तब्बल 179 मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली आहेत.

अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक पोद्दार यांनी ‘पोद्दार हॉस्पिटल अँड अॅक्सिडेन्ट केअर’च्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून लातूर आणि परिसरातील रुग्णांची जी सेवा केली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो, वाढलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना डॉ. पोद्दार यांच्या मनात होती. समाजातील शेवटच्या घटकाला, गरीबातील गरीब रुग्णालाही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने त्यांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. 1999 मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा शुभारंभ केला. एखाद्या कामात सातत्य असणे किती महत्त्वाचे असते, याचे उदाहरण म्हणजे आजवर त्यांनी पूर्ण केलेली 179 मोफत तपासणी आरोग्य शिबिरे आहेत.या शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 20 ते 22 हजार रुग्णांनी थेट लाभ घेतला आहे. त्यांच्या या कार्यात विविध नामांकित औषध कंपन्यांचे प्रतिनिधी, हॉस्पिटलमधील सहकारी डॉक्टर्स आणि मित्रमंडळींची मोलाची साथ लाभली आहे.

जेव्हा एखादा माणूस निःस्वार्थ भावनेने काम करतो, तेव्हा त्याला समाजाचे आपसूकच प्रेम मिळते. डॉ. अशोक पोद्दार यांचा हा सेवेचा रथ असाच पुढे सुरू राहणार असून, भविष्यातही अशा शिबिरांच्या माध्यमातून लातूरकर आणि परिसरातील जनतेची सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. लातूर जिल्हात आरोग्य तपासणी शिबिरांचा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचे काम डॉक्टर पोद्दार यांनी केले आहे.