
बाळाजी आवजी चिटणीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू व पराक्रमी चिटणीस (सचिव) होते. त्यांचे मूळ घराणे चित्रे होते आणि ते रायगडमधील मुरुड जंजिरा परिसरातील होते. 1661 मध्ये राजापूरच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर महाराजांनी त्यांना स्वराज्याच्या चिटणिशीचे काम दिले. त्यांनी 1661 ते 1681 पर्यंत अत्यंत निष्ठा, तल्लख स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या बळावर चिटणिशीचे काम पाहिले. आग्य्राच्या कैदेत असताना शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या नियोजनात व स्वराजाच्या कारभारात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. महाराजांच्या काळात त्यांचा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सहभाग होता. बाळाजी आवजींचे सुपुत्र खंडो बल्लाळ पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या व स्वराज्याच्या सेवाभावाने पाठीशी उभे राहिले, ज्यांना नंतर स्वराज्याची चिटणिशी बहाल करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या स्मृतिनिमित्त पाली-सुधागड परिसरातील औंढा येथे त्यांची ‘छत्री समाधी’ उभारली.




























































