चालकाचे नियंत्रण सुटलेली कार शाळेच्या आवारात घुसली; विद्यार्थिनीचा मृत्यू, मोखाड्याच्या आडोशी येथील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव इको कार शाळेच्या आवारात घुसल्याने एकच हाहाकार उडाला. मोखाड्याच्या आडोशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली असून यात एका बारा वर्षांच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. सोनम खरपडे असे या मृत मुलीचे नाव आहे.

मृत सोनम खरपडे (१२) आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ६वीमध्ये शिक्षण घेत होती. ती शाळेत जात असताना शाळेच्या पटांगणात पांढऱ्या रंगाची इको गाडी (क्रमांक एम.एच-१४-एम.सी-७९४३) उभी होती. त्याच गावातील शंकर घाटाळ (३६) याने सदर गाडीच्या चालकाकडून चावी मागून घेत गाडी चालू केली.

गाडी सुरू होताच त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती गाडी भरधाव शाळेच्या आवारात घुसली. त्यावेळी आवारात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांची पळापळ झाली. मात्र सोनम हिला पळता न आल्याने गाडीने तिला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात सोनमच्या छातीला, डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.