
जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि विद्यमान विजेत्या चीनच्या लिऊ शेंग शू-तान निंग जोडीला कडवी झुंज देत त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानला कांस्य पदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत हिंदुस्थानी जोडीचा चीनकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव झाला. मात्र बिनमानांकित त्रिशा-गायत्रीची कामगिरी ऐतिहासिक ठरली.
पहिल्या गेममध्ये हिंदुस्थानी जोडीने 7-2 अशी आघाडी घेत चीनला धक्का दिला. 18-18 अशी बरोबरी असताना त्रिशाच्या जबरदस्त क्रॉस-कोर्ट फटक्याने हिंदुस्थानने आघाडी घेतली आणि पहिला गेम 21-18 असा जिंकला.
दुसऱया गेममध्ये चीनने पुनरागमन करत 21-13 अशी बाजी मारली. निर्णायक गेममध्येही त्रिसा-गायत्रीने सुरुवातीला झुंज दिली. मात्र चीनने वेग वाढवत मध्यंतराला 11-5 अशी आघाडी घेतली. अखेर 21-8 असा गेम जिंकत चीनने अंतिम फेरी गाठली.
हिंदुस्थानला 14 वर्षांनंतर पदक
महिला दुहेरीत हिंदुस्थानने 2011नंतर प्रथमच जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावले आहे. त्या वेळी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकले होते.



























































