पितृसत्ताक व्यवस्थेला उखडून टाका! ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधी यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशाचे भविष्य आणि पाया आहे. मात्र, पितृसत्ताक व्यवस्था महिलांना घाबरवते, धमकावते आणि पंट्रोल करते. अशा या पितृसत्ताक व्यवस्थेला उखडून टाका असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज तरुणींना केले. महिला कुणाच्या मालकीच्या नाहीत त्या स्वतंत्र आहेत. मात्र, मनुस्मृतीतील महिलांविषयीचे विचार लाजीरवाणे आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला विद्यार्थिनींची तुफान गर्दी उसळली होती. तरुणींसाठी आयोजित या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच आज राजकीय बोलणार नाही असे सांगून महिलांची सुरक्षितता, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, सार्वजनिक वाहतूक आणि सामाजिक बंधने या मुद्दय़ांवर थेट संवाद साधण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, विविध भागांतून आलेल्या तरुणींना व्यासपीठावर बोलावून राहुल गांधी यांनी त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांवर केवळ भाषण न राहता त्यांच्या प्रत्यक्ष व्यथा कार्यक्रमात समोर आल्या.

मनुस्मृतीमध्ये बालपणी स्त्र्ााrने वडिलांच्या अधीन राहावे, तारुण्यात पतीच्या अधीन राहावे आणि पतीच्या मृत्यूनंतर मुलांच्या अधीन राहावे, असे म्हटले आहे. म्हणजेच स्त्र्ााr कधीही स्वतंत्र असू शकत नाही, असा विचार मनुस्मृतीतून मांडला जातो. मनुस्मृतीतील  विचार लाजीरवाणे आहेत, अशी टीका गांधी यांनी केली. महिला उद्योजक आहेत, खेळाडू आहेत आणि विविध क्षेत्रांत चमकदार काम करत आहेत. तरीही त्यांची ओळख अनेकदा कोणाची मुलगी, कोणाची पत्नी किंवा कोणाची आई यावरूनच ठरवली जाते. पितृसत्ताक व्यवस्था महिलांवर नियंत्रण ठेवते, महिलांना धाक दाखवते आणि दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते. ही पितृसत्ताक व्यवस्था उखडून टाकली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

 तरुणीने मांडल्या पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी

पुण्यातील पीएमपीएल बससेवेतील गर्दी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात एका तरुणीने थेट मांडला. बसमध्ये गर्दी असताना पुरुषाकडून छेडछाडीचा सामना करावा लागतो. एवढेच नव्हे, तर एखाद्या पुरुषाच्या शेजारी असलेल्या सीटवर बसावे की नाही, याचाही विचार करावा लागतो, अशी व्यथा मांडली. सार्वजनिक वाहतूक ही महिलांसाठी सुरक्षित असणे आवश्यक आहे. बसमध्ये छेडछाड झाल्यानंतरही आजूबाजूच्या महिलांकडून मदत मिळत नसेल, तर महिलांनी सुरक्षिततेसाठी नेमके कुणाकडे पाहायचे, असा प्रश्न निर्माण होतो असे ती म्हणाली.

‘पेपर लीकविरोधात विद्यार्थ्यांना साथ द्या’

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असतानाही एमपीएससी पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचा मुद्दा एका तरुणीने मांडला. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात; मात्र पेपर लीक होतात. त्यामुळे परीक्षाप्रक्रियेत न्याय आणि पारदर्शकता आणण्याची मागणी तिने केली. या लढाईत तुम्ही आमची साथ द्या, अशी विनंती तिने राहुल गांधी यांना केली.

‘महिलाविरोधी मानसिकते’वरून भाजपवर निशाणा

कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी आरएसएसप्रमुख मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची काही वक्तव्ये व व्हिडिओ उपस्थित मुलींना दाखविले. महिलांच्या स्वातंत्र्याला विरोध करणारी तसेच मनुस्मृतीचे समर्थन करणारी मानसिकता या वक्तव्यांतून दिसून येते, असा दावा करत गांधी यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली.

‘पुणे म्हणजे प्रेम’

महिलांच्या स्वातंत्र्यापासून सुरक्षिततेपर्यंत विविध मुद्यांवर मुलींशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी मराठीतून संवाद साधत आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचा समारोप केला. पुणे म्हणजे प्रेम. लव्ह यू ऑल, असे म्हणताच उपस्थित विद्यार्थिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

फिटनेस तपासणीच्या नावाखाली प्रेग्नेंसी टेस्ट

एका आदिवासी तरुणीने आपल्या प्रश्नांची व्यथा राहुल गांधी यांच्यासमोर मांडली. आश्रमशाळांमध्ये फिटनेस तपासणीच्या नावाखाली महिलांची प्रेग्नेंसी टेस्ट केली जात असल्याचा गंभीर मुद्दा एका तरुणीने उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थिनी गेल्या दहा दिवसांपासून मांजरी येथे उपोषणाला बसल्याचे तरुणीने सांगितले. हे ऐकताच राहुल गांधी म्हणाले, मी स्वतः आंदोलनात येतो. त्यांनी हे आश्वासन देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.