
>> स्वरदा वैद्य
दिल्लीमध्ये झालेल्या तरुणांच्या आंदोलनानंतर त्यांच्या भाषेविषयी बरीच चर्चा घडली. आजच्या काळाला, जीवनशैलीला सुसंगत वाटणारी ही ‘जेन झी’ भाषा, त्यांच्या भोवतीची डिजिटल क्रांती याविषयी…
आजची जनरेशन झेड ही पूर्णपणे डिजिटल युगात वाढलेली पिढी आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यासोबत वाढल्यामुळे त्यांच्या विचारांप्रमाणेच त्यांच्या भाषेतही मोठे बदल झाले आहेत. त्यांच्या संवादात मराठी, इंग्रजी, इंटरनेट स्लँग, इमोजी आणि संक्षिप्त शब्द यांचे सहज मिश्रण दिसून येते. भाषेतील हा बदल स्वाभाविक असला, तरी त्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिणामही तितकेच महत्त्वाचे आहेत.
‘आजचं लेक्चर पूर्णपणे क्रिंज होतं, पण शेवटचा पॉइंट लो की चांगला होता,’ असे एखादे वाक्य तरुणांच्या तोंडून सहज ऐकायला मिळते. या वाक्यातील अनेक शब्द डिजिटल जगातून आलेले आहेत. ही बोलण्याची नवीन पद्धत म्हणजे एका नव्या भाषिक संस्कृतीची सुरुवात आहे. भाषा ही कधीच स्थिर राहात नाही. काळानुसार, समाजानुसार आणि तंत्रज्ञानानुसार ती सातत्याने बदलत असते. पत्रव्यवहाराच्या काळात वापरली जाणारी भाषा वेगळी होती.
प्रत्येक पिढीने आपली स्वतंत्र भाषाशैली निर्माण केली आहे. त्यामुळे आजची जनरेशन झेडदेखील स्वतच्या जीवनशैलीनुसार भाषा घडवत आहे. या पिढीचे बालपण इंटरनेटच्या जगात गेले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, यूटय़ूब, स्नॅपचॅट आणि इतर डिजिटल माध्यमांचा त्यांच्या भाषेवर मोठा प्रभाव आहे. ओके असे लिहिण्याऐवजी अंगठा दाखवणारा इमोजी पाठवणे, खूप छान या शब्दांऐवजी फायर इमोजी वापरणे किंवा मोठय़ाने हसल्याचे दाखवण्यासाठी हसणारा इमोजी पाठवणे, ही त्यांच्यासाठी अत्यंत सामान्य गोष्ट आहे. याचबरोबर एलओएल, ओएमजी, बीटीडब्ल्यू, आयडीके, टीबीएच, एफआर यांसारखी संक्षिप्त रूपेही तरुणांच्या बोलण्यात सहजपणे मिसळली आहेत. त्याचप्रमाणे क्रिंज, व्हाइब, स्ले, रिअल, ओपी, लो की, हाय की, डेड, सीन यांसारखे शब्दही मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. या शब्दांचा अर्थ जुन्या पिढीला अनेकदा समजत नाही, पण तरुणांच्या संवादात ते पूर्णपणे नैसर्गिक झाले आहेत.
भाषेतील या बदलामागे तंत्रज्ञानाचा वेग हे सर्वात मोठे कारण आहे. इन्स्टाग्राम रिल्स, यूटय़ूब शॉर्ट्स आणि इतर डिजिटल माध्यमांनी माहिती काही सेकंदांत पोहोचवण्याची सवय लावली आहे. त्यामुळे लांब वाक्यांऐवजी छोटे संदेश, विस्तृत स्पष्टीकरणाऐवजी संक्षिप्त प्रतिक्रिया आणि पूर्ण शब्दांऐवजी लहान रूपांचा वापर वाढला आहे. जितका संदेश छोटा, तितका तो प्रभावी, अशी मानसिकता तयार झाली आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, डिजिटल माध्यमांमुळे संवादाचा वेग वाढला असला, तरी संयम कमी झाला आहे. आजचे युवक काही सेकंदांत समजणारी माहिती अधिक पसंत करतात. त्यामुळे मोठे लेख, प्रदीर्घ चर्चा किंवा सखोल वाचन यांकडे त्यांचा कल कमी होत असल्याचे दिसून येते. ही प्रवृत्ती त्यांच्या भाषेतही स्पष्टपणे दिसते. सर्वात मोठी चिंता म्हणजे या बदलाचा वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम. दीर्घ वाचनामुळे विश्लेषणात्मक विचार, तर्कशक्ती आणि अभिव्यक्तीची गुणवत्ता विकसित होते, परंतु झटपट माहितीच्या सवयीमुळे ही क्षमता हळूहळू कमी होण्याची भीती शिक्षणतज्ञ व्यक्त करतात. शिक्षकांचाही अनुभव याला दुजोरा देणारा आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेतील उत्तरपत्रिकांमध्येही सोशल मीडियावरील भाषेचा वापर करतात. वाक्यरचना अपुरी असते, शुद्धलेखनाच्या चुका वाढतात आणि विचार मांडण्याचा क्रम विस्कळीत होतो.
भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते. ती एखाद्या समाजाची ओळख, संस्कृती, इतिहास आणि परंपरा जपणारे माध्यम असते. मराठी भाषेतून संत साहित्य, लोककथा, अभंग, भारुडे, लोकगीते आणि समृद्ध साहित्यपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचली आहे. जर नवीन पिढी मातृभाषेपासून दूर जाऊ लागली, तर केवळ शब्द हरवणार नाहीत, तर सांस्कृतिक स्मृतीही कमकुवत होण्याचा धोका निर्माण होईल. मात्र मिश्र भाषा वापरणे चुकीचे आहे, असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. जगातील कोणतीही भाषा पूर्णपणे शुद्ध राहिलेली नाही. मराठीनेही संस्कृत, फारसी, अरबी, हिंदी, पोर्तुगीज आणि इंग्रजीतील अनेक शब्द स्वीकारले आहेत.
भाषेचा विकास हा नव्या शब्दांच्या स्वीकारातूनच होत असतो. त्यामुळे जनरेशन झेडची भाषा ही बदलत्या काळाची नैसर्गिक देणगी आहे. समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा अनौपचारिक भाषा प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. मित्रांशी गप्पा मारताना वापरली जाणारी भाषा आणि परीक्षा, संशोधन, पत्रकारिता, प्रशासन किंवा व्यावसायिक पत्रव्यवहारात वापरली जाणारी भाषा यामध्ये फरक असणे आवश्यक आहे. योग्य प्रसंगी योग्य भाषा वापरणे, हीच खरी भाषिक परिपक्वता आहे.
पालक आणि शिक्षकांनीही नव्या पिढीची भाषा पूर्णपणे नाकारण्याऐवजी ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व, पुस्तकवाचनाची सवय, सर्जनशील लेखन आणि व्याकरणाचे ज्ञान यांचीही जाणीव करून दिली पाहिजे. शाळांमध्ये पुस्तक चर्चा, कथाकथन, वादविवाद, निबंधलेखन आणि वाचन उपक्रम वाढवले, तर विद्यार्थी सहजपणे डिजिटल भाषा आणि प्रमाण भाषा यांच्यातील समतोल साधू शकतील.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हॉईस असिस्टंट, स्वयंचलित भाषांतर आणि डिजिटल संवाद यामुळे भाषेचे स्वरूप आणखी बदलणार आहे. विविध भाषांचे मिश्रण अधिक सामान्य होईल. मात्र तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, तरी भाषेचा आत्मा हा मानवी भावना, विचार आणि प्रभावी संवाद यामध्येच कायम राहणार आहे. म्हणूनच जनरेशन झेडची भाषा योग्य की अयोग्य हा प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीनुसार योग्य भाषेची निवड करण्याचे कौशल्य आपण नव्या पिढीला देत आहोत का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. जर त्याचे उत्तर होकारार्थी असेल, तर बदलत्या काळातही मराठी भाषेचे सौंदर्य, समृद्धी आणि संस्कृती सुरक्षित राहील.




























































