शैलगृहांच्या विश्वात – पांडवांची नसलेली नाशिकची पांडवलेणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव 

नाशिकमधील त्रिरश्मी डोंगरात कोरलेली शैलगृहे पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. या शैलगृहांच्या रचनेत त्यांचे वेगळेपण लक्षात येते. प्राचीन भारत भारताबाहेरील धार्मिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दर्शवणारी ग्रिफिन, घुबड, स्फिन्क्स अशी वैशिष्ट्यपूर्ण शिल्परचना आढळते

पांडवांचा अजिबात संबंध नसलेली, पण पांडवलेणी नावाने प्रसिद्ध असलेली, नाशिकमधील त्रिरश्मी डोंगरात कोरलेली ही शैलगृहे मुळात बौद्ध भिक्षूंच्या वर्षाकालातील निवासासाठी तयार केली होती. पण काळाच्या ओघात तिथे वर्षभर निवास होऊ लागला असावा असे दिसते. ही शैलगृहे कोरण्यासाठी अनेक देशी आणि विदेशी मूळ असलेल्या श्रीमंत लोकांनी दान दिल्याचे येथील शिलालेखात नमूद केले आहे, हे आपण मागील भागात पाहिले. शैलगृह क्रमांक 17 मध्ये असलेल्या शिलालेखात त्याचा दानकर्ता यवन असल्याचा उल्लेख आहे, तर शैलगृह क्रमांक 10 आणि 24 मधील लेखांमधून दानकर्ते शक असल्याचे लक्षात येते. इतर शैलगृहे सातवाहन राजवंशातील राजांनी किंवा सातवाहनांच्या कार्यकालामध्ये इतर लोकांनी दाने दिल्याचे उल्लेख दानलेखात आढळतात.

या दानलेखामधून दानकर्त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल कळल्यानंतर जेव्हा त्या शैलगृहाचे बारकाईने निरीक्षण केले जाते तेव्हा त्या शैलगृहातील अनेक बारकावे आणि त्यांचे वेगळेपण आपल्या लक्षात यायला सुरुवात होते. लेणे क्रमांक 17 अपूर्ण अवस्थेत असले तरी त्याच्या अनोख्या रचनेमुळे विशेष महत्त्वाचे आहे. बौद्ध स्थापत्याच्या मूळ संकल्पनेत चैत्यगृह आणि भिक्षूंच्या निवासासाठीच्या खोल्या या वेगवेगळ्या असाव्यात अशी योजना होती. पण येथील लेखामध्येच असा स्पष्ट उल्लेख केला आहे की, विहाराच्या आत चैत्यगृह कोरणार आहे. दुर्दैवाने ते पूर्ण झाले नाही, पण त्याची सुरुवात झालेली पाहायला मिळते. संपूर्ण भारतात ही कल्पना शिलालेखात पहिल्यांदा नाशिक येथे आलेली दिसते.

हा दानकर्ता इंद्राग्निदत्त नावाचा एक ‘यवन’ होता. ‘यवन’ ही संज्ञा प्राचीन भारतीय शिलालेखांमध्ये ग्रीक किंवा ग्रीक परंपरेशी संबंधित व्यक्तींसाठी वापरली जात असे. त्याच्या लेखात त्याने तो उत्तरेकडील ‘दत्तामित्री’ नावाच्या गावाहून आला होता हे सांगितले आहे. त्याचप्रमाणे हे लेणे त्याने त्याच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ कोरले होते असाही उल्लेख लेखात आहे. लेखाच्या सुरुवातीला सर्व बुद्धांना नमन केलेले दिसते. बौद्ध धर्मातील संकल्पनांचा आविष्कार या लेखात झाल्याने दानकर्ता इंद्राग्निदत्त बौद्ध धर्माचा अनुयायी असावा असे वाटणे साहजिक आहे. पण याचे नाव ‘इंद्राग्निदत्त’ मात्र त्याचा वैदिक परंपरेशी असलेला संबंध दर्शवते. यावरून कदाचित त्याचे आई वडील वैदिक धर्मानुयायी होते आणि त्याचा ओढा मात्र बौद्ध धर्माकडे होता, असे वाटते. या शैलगृहाच्या व्हरांड्यातील स्तंभांवरचे शीर्ष हे पंख असलेल्या ग्रिफिनच्या आकृतीचे आहे. गरुड आणि सिंह यांचे मिश्रण असलेला हा काल्पनिक प्राणी मूळ भारतीय परंपरेत नाही. तो ग्रीक कलेत बरेचदा आढळतो. सिंहाला पशूंचा राजा आणि गरुडाला पक्ष्यांचा राजा मानले जाते. त्यांच्या या एकत्रीकरणामुळे ग्रिफिनसुद्धा शक्तिशाली असतो असे मानले गेले. त्याच्याकडे दैवी शक्ती असते, त्यामुळे तो खजिना आणि धार्मिक स्थळांचे रक्षण करतो अशी समजूत होती. या शैलगृहाचे दान एका यवनाचे असल्यामुळे त्यांच्या मूळ परंपरेतील रक्षणाचे कार्य करणाऱ्या या प्राण्याचे अंकन शैलगृहाच्या प्रवेशद्वारापाशी असणे साहजिकच आहे.

अशा प्रकारची अनेक उदाहरणे नाशिक येथील या शैलगृहसमूहात पाहायला मिळतात, ज्यामध्ये दान देणाऱ्या व्यक्तीच्या धार्मिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब त्या लेण्याच्या सजावटीत पाहायला मिळते. याचे एक महत्त्वाचे उदाहरण लेणे क्रमांक 24 मध्ये दिसते. हे लेणे दामचिक वुधिक नावाच्या एका शक म्हणजे पर्शियन माणसाने दान दिले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दान देणारा एक व्यावसायिक लेखक होता. या समूहात लेख लिहिण्यासाठी मिळालेल्या कामानंतर त्याला स्वत:लाही दान देण्याची इच्छा झाली असावी. या लेण्याच्या वरच्या बाजूला, येणाऱ्या रस्त्याकडे लक्ष ठेवून असलेल्या एका घुबडाचे शिल्प कोरले आहे. प्राचीन भारतीय परंपरेत घुबड हे अशुभ आणि मृत्यूचे प्रतीक मानले जात असे. त्यामुळे एखाद्या धार्मिक वास्तूवर घुबड कसे काय दाखवले आहे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण ग्रीक परंपरेत अथेन्स या शहराची अधिष्ठात्री आणि रक्षणकर्ती देवता अथेना हिचे घुबड हे वाहन आहे. पाश्चिमात्य परंपरेत घुबड हे ज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच ते रात्री जागे असते. त्यामुळे या विहारावर जर रात्री काही संकट आले तर तिथले घुबड पाहून ते परत निघून जाईल, अशा प्रकारच्या विचाराने कदाचित हे घुबड इथे कोरले असावे.

असेच अजून एक मोठे उदाहरण म्हणजे लेणे क्रमांक 10 मधील स्तंभशीर्ष आणि त्यावरील परकीय प्रभाव. हे लेणे पश्चिमी शक क्षत्रप राजा नहपान याचा जावई उषवदात याने दान दिलेले आहे. मानवाचे शिर आणि सिंहाचे किंवा इतर प्राण्याचे धड अशा प्रकारची रचना असलेला स्फिंक्स नावाचा काल्पनिक प्राणी या शैलगृहाच्या व्हरांड्यात स्पष्टपणे पाहायला मिळतो. हा एक काल्पनिक प्राणी आहे जो प्राचीन इजिप्शियन आणि ग्रीक वास्तुकलेमध्ये वारंवार दिसून येतो. त्याचप्रमाणे  प्राचीन भारतीय वास्तुकलेमध्येही स्फिन्क्सचे चित्रण पाहायला मिळते. स्फिन्क्सची मूळ संकल्पना इजिप्तमधून आली आहे, जिथे त्याचे चित्रण पुरुषरूपात केले गेले होते. ग्रीक संस्कृतीत स्फिन्क्स हा एक स्त्रीरूपातील निर्दयी प्राणी होता. तथापि, हे दोन्ही स्फिन्क्स वास्तूंच्या, मुख्यत: धार्मिक वास्तूंच्या तसेच राजांच्या स्मारकांच्या प्रवेशद्वारावर बसवले जात असत. भारतीय संदर्भात, बौद्ध धार्मिक स्थापत्यामध्ये स्फिन्क्सचे चित्रण पाहायला मिळते, तेही गुहेच्या प्रवेशद्वारावर किंवा चैत्यगृहाच्या आत.

आजही भारतात अशा प्रकारच्या संकल्पनांचा आविष्कार दिसतो. त्यापैकीच काही ग्रिफिन, घुबड आणि स्फिन्क्स या स्वरूपात पाहायला मिळतात. या शैलगृहांमधील शिल्पांमध्ये अशा प्रकारचा विचार करून तयार केलेली चिन्हे आणि शिल्पाकृती प्राचीन भारतातील लोकांच्या मनातील भीती आणि त्यावर त्यांनी काढलेले उपाय याचे महत्त्वाचे पुरावे आहेत. या स्थळाची कहाणी इथेच संपत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेल्या या शैलगृहांनी शिलालेखांच्या स्वरूपात आपल्या पोटात काही अतिशय महत्त्वाचे पुरावे जतन केले आहेत. त्यांची आणि उरलेल्या शैलगृहांची माहिती पुढील भागात पाहू.

[email protected]

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)