देखणे न देखणे- खेळ मांडियेला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मीनाक्षी पाटील
[email protected]

पौर्वात्य असो की पाश्चात्त्य, या दोन्ही नाट्य़ परंपरांमध्ये काळ आणि अवकाश या संकल्पना स्थिर न राहता सतत विकसित होत गेल्या आहेत. आजच्या रंगभूमीवर काळ आणि अवकाश हे केवळ कथानकाची चौकट म्हणून राहिलेले नाहीत; तर ते प्रतीकात्मकता, विचार प्रवर्तन, अर्थ निर्मिती आणि प्रेक्षकानुभव यांचे सक्रिय माध्यम बनले आहेत.

एकोणिसाव्या शतकातील नाटकांमधील काळ व अवकाश यांचे स्वरूप आपण मागील लेखात पाहिले. विसाव्या शतकात मात्र नाटकातील पारंपरिक मर्यादा झुगारून बर्टोल्ट ब्रेख्तसारखे नाटककार एपिक थिएटरमध्ये काल-अवकाशाची सलगता जाणीवपूर्वक खंडित करत होते. नाटकातील दृश्यांमध्ये अचानक बदल, निवेदने, गीते आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या सहाय्याने प्रेक्षकाला भावनिक गुंतवणुकीऐवजी चिकित्सक दृष्टी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेथे काळ हा इतिहासाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा निर्देशक ठरला, तर अवकाश हा सामाजिक वास्तवाचे विश्लेषण करणारा मंच बनला. याच काळात सॅम्युएल बेकेटसारख्या अॅब्सर्ड नाटके लिहिणाऱ्या नाटककारांनी काळ आणि अवकाश यांना एक वेगळा असा अस्तित्ववादी अर्थ दिला. ‘वेटिंग फॉर गोदो’सारख्या नाटकात कथानक जवळजवळ स्थिर आहे; काळ पुढे सरकत असल्यासारखा वाटतो, पण प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नाही. रंगमंचावर जवळजवळ रिकामा अवकाश असतो. अशा मांडणीत अवकाश हा मानवी अस्तित्वातील निरर्थकता, प्रतीक्षा आणि एकाकीपणा या मानसिक अवस्थेचे प्रतीक बनतो.

पुढील काळातील आधुनिक आणि उत्तर-आधुनिक नाटय़प्रयोगांमध्ये काळाची एकरेषीय संकल्पना पूर्णपणे मोडलेली दिसते. स्मृती, स्वप्ने, कल्पना, इतिहास, वर्तमान आणि भविष्य हे एकाच दृश्यात एकत्र आलेले दिसतात. तसेच एकाच रंगमंचावर अनेक अवकाश एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात. प्रकाशयोजना, ध्वनी, मल्टिमीडिया, प्रोजेक्शन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे दृश्यबदल क्षणार्धात घडू शकतात. त्यामुळे रंगमंचाचा भौतिक अवकाश आता आभासी (Virtual) आणि प्रतीकात्मक अवकाशात रूपांतरित होऊ लागला आहे. यावरून असे स्पष्ट होते की, पौर्वात्य असो की पाश्चात्त्य, या दोन्ही नाटय़परंपरांमध्ये काळ आणि अवकाश या संकल्पना स्थिर न राहता सतत विकसित होत गेल्या आहेत.

अरिस्टॉटलच्या एकतेच्या तत्त्वापासून आधुनिक बहुआयामी काल-अवकाशापर्यंतचा हा प्रवास म्हणजे नाटकाच्या अभिव्यक्तिसामर्थ्याचा इतिहास आहे. आजच्या रंगभूमीवर काळ आणि अवकाश हे केवळ कथानकाची चौकट म्हणून राहिलेले नाहीत; तर ते प्रतीकात्मकता, विचारप्रवर्तन, अर्थनिर्मिती आणि प्रेक्षकानुभव यांचे सक्रिय माध्यम बनले आहेत.
मराठी रंगभूमीच्या इतिहासाचा विचार केला तर त्यातही काळ आणि अवकाश यांच्या उपयोजनात सातत्याने परिवर्तन झाल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकातील संगीत नाटकांमध्ये रंगमंचीय अवकाश प्रामुख्याने भव्य नेपथ्य, पडदे आणि दृश्यबदल यांवर आधारित होता. राजदरबार, वनप्रदेश, मंदिर किंवा राजवाडा यांसारखी स्थाने दृश्यात्मक पद्धतीने उभी केली जात. त्यामध्ये कथानकाचा कालक्रम तुलनेने एकरेषीय असल्याने काळाचा प्रवास स्पष्टपणे जाणवत असे. तथापि संगीत, पदे आणि अभिनय यांच्या वापराने वास्तव दर्शनापेक्षा भावविश्वदर्शन तसेच काळाचं सूचक दर्शनही अधिक महत्त्वाचे ठरत असे. पुढे सामाजिक नाटकांच्या उदयानंतर नाटय़ावकाश अधिक वास्तववादी बनला. घर, न्यायालय, शाळा, कार्यालय किंवा गाव यांसारखी दैनंदिन जीवनातील स्थाने रंगमंचावर साकारू लागली. यामुळे पात्रे आणि प्रेक्षक यांच्यातील मानसिक अंतर कमी झाले. नाटकातील काळही दैनंदिन जीवनाशी जोडला गेला आणि सामाजिक परिवर्तनाचे भानही अधिक तीव्र झाले.

मराठीतील आधुनिक नाटककारांनी काल-अवकाशाच्या संकल्पनेला नवे परिमाण दिले. विजय तेंडुलकर यांच्या नाटकांमध्ये अवकाश हा केवळ भौतिक नसून सत्तासंबंध, हिंसा, लिंगभेद आणि सामाजिक संघर्ष व्यक्त करणारा आशयसूचक घटक बनलेला दिसतो. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात ऐतिहासिक काळ-अवकाश व समकालीन राजकीय काळ-अवकाश यांची कीर्तन, लावणी, तमाशा, भजन, गोंधळ, दशावतार आदि लोकनाटय़ सादरीकरणाच्या प्रकारांद्वारे खूपच मार्मिक सांगड घातलेली दिसते. येथे इतिहास हा केवळ भूतकाळ नसून वर्तमानाचे चिकित्सक वाचन करणारे माध्यम ठरतो.

महेश एलकुंचवार यांच्या नाटकांमध्ये काळ हा स्मृती, नातेसंबंध आणि मानसिक अनुभव यांच्याशी जोडलेला आहे. त्यांच्या नाटकांतील घराचा अवकाश हा केवळ वास्तू नसून मानवी एकाकीपणा, मूल्यांचा ऱ्हास आणि अस्तित्वातील पोकळी यांचे प्रतीक बनतो. त्यामुळे रंगमंचावरील जागेला मानसशास्त्राrय अर्थ प्राप्त होतो. प्रयोगशील रंगभूमीवरील दिग्दर्शकांनीही काल-अवकाशाच्या अभिव्यक्तीत महत्त्वपूर्ण प्रयोग केले. कमीत कमी नेपथ्य, प्रतीकात्मक वस्तू, शरीरभाषा, प्रकाश आणि ध्वनी यांच्या सहाय्याने काल व अवकाशाच्या मोडतोडीतून सूचक अर्थाच्या अनंत छटा व्यक्त होऊ लागल्या. प्रकाशातील एका बदलामुळे दिवसाचे रात्रीत, वर्तमानाचे भूतकाळात किंवा वास्तवाचे स्वप्नात रूपांतर घडू लागले. यामुळे नाटय़ावकाश प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीत विस्तारत जाऊ लागला. महानिर्वाण, बेगम बर्वे, बादल सरकारांची नाटके यांची येथे आवर्जून आठवण होते.

समकालीन रंगभूमीवर डिजिटल तंत्रज्ञानामुळेही काळ आणि अवकाश यांच्या मांडणीत नवे आयाम जोडले गेले आहेत. अतुल पेठे यांच्या ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटय़प्रयोगाचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सदर नाटय़प्रयोगात प्रोजेक्शन, एलईडी क्रीन, मल्टिमीडिया, ध्वनीसंयोजन आणि संगणकीय प्रकाशयोजना यांच्या सहाय्याने एका क्षणात विविध स्थळे, वेगवेगळे काळ किंवा मानसिक जग रंगमंचावर साकार झालेले दिसते. भौतिक रंगमंच आणि आभासी प्रतिमा यांच्या संयोगातून एक नवीनच प्रकारचा नाटय़ानुभव येथे निर्माण झालेला दिसतो. अशाच प्रकारच्या काळ व अवकाशातील दृश्य-अदृश्याचा खेळ पाहूया पुढील लेखात.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या
सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)