सत्ताधाऱ्यांकडून घाबरवले जाईल, भाजपच्या दबावाला बळी न पडता खंबीरपणे लढा! राहुल गांधींचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून तुम्हाला धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तुम्ही खंबीरपणे लढत राहा, असा कानमंत्र काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आज दिला.

‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यात काल भाजपप्रणीत विद्यार्थी संघटना अभाविप आणि एनएसयूआयमध्ये घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी सताधाऱ्यांकडून यापुढेही तुम्हाला अशाच प्रकारे धमकावले आणि घाबरवले जाईल; मात्र तुम्ही मागे हटू नका. भाजपविरोधातील संघर्ष सुरू ठेवा, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती विधिमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

काँग्रेसमधील मरगळ दूर झालीय – विशाल पाटील

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची ही वेळ नाही. आम्ही एवढे दिवस प्रयत्न करत होतो; मात्र आता लोकांमध्ये त्या गोष्टी पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याचा आनंद आहे. काँग्रेसमध्ये जी मरगळ म्हणत होती, ती दूर झालेली पाहायला मिळते, असे काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील म्हणाले.