
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या इतर मातब्बर खेळाडूंनी निराश केलं. मात्र, त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने ऐतिहासिक कामगिर करत महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले आहे. या पदकासह त्रिशा आणि गायत्री यांच्या या जोडीने हिंदुस्थानची महिला दुहेरीतील 15 वर्षांची पदकांची प्रतिक्षा संपुष्टात आणली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची लढत चीनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल आणि पहिल्या मानांकित लिऊ शेंग शु आणि टॅन निंग यांच्याविरुद्ध झाली. सामन्याला सुरुवात होताच हिंदुस्थानच्या जोडीने दमदार खेळ करत पहिला गेम 21-18 असा जिंकला. परंतु त्यानंतर चायनीज जोडीने जोरदार पुनरागमन करत पुढचे दोन्ही गेम अनुक्रमे 21-13 आणि 21-8 असे आपल्या नावावर केले आणि हिंदुस्थानच्या जोडीला पराभवाचा सामना करत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोन्नप्पा यांनी कांस्यपदक जिंकले होते.
या ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात एका दणकेबाज विजयाने झाली. उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानच्या जोडीने चीनच्या चौथ्या मानांकित जिया यी फान आणि झांग शू झियान यांचा तीन गेम चाललेल्या चुरशीच्या लढतीत पराभव करून देशासाठी पदक निश्चित केले. शुक्रवारी झालेल्या अन्य सामन्यांमध्ये, भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीला चीनच्या तिसऱ्या मानांकित लियांग वेईकेंग आणि वांग चाँग यांच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेत पी.व्ही. सिंधी, लक्ष्य सेन, उन्मती हुड्डा आणि आयुष शेट्टी यांसारखे एकेरीचे दिग्गज खेळाडू आधीच बाहेर पडल्यामुळे त्रिशा आणि गायत्रीचे कांस्यपदक हेच हिंदुस्थानसाठी या स्पर्धेतील एकमेव पदक ठरले.



























































