कचरा, मर्सिडीजवरून भाजप-शिंदे गटात पुन्हा जुंपली, नवी मुंबई पालिकेच्या महासभेत महागोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागोंधळ सभा म्हणून प्रचलित होत असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या महासभेत आज भाजप आणि शिंदे गट यांच्यात पुन्हा जोरदार जुंपली. सभागृह नेते सागर नाईक हे वापरत असलेली मर्सिडीज कार ही एका ठेकेदाराची असून त्याच्या कामाची वर्कऑर्डर निघण्यापूर्वी २४ तास अगोदर या गाडीची आरटीओत नोंदणी झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला. तर शिंदे गटाकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे हे कुभांड रचले जात आहे, असा पलटवार भाजपच्या वतीने करण्यात आला.

शिंदे गटाच्या नगरसेवकांनी मर्सिडीज कार आणि कचऱ्याच्या ठेक्यावरून पालिका मुख्यालयात जोरदार निदर्शने केली. हे नगरसेवक काळ्या रंगाचे जॅकेट घालून सभागृहात गेल्यानंतर वातावरण आणखी तापले आणि एकच गदारोळ उडाला. हा गोंधळ आटोक्यात येत नाही हे निदर्शनास आल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान शिंदे गटाच्या नगरसेवकांनी जे आरोप केलेत त्यात काही तथ्य नाही. हिम्मत असले तर त्यांनी तक्रार करावी. मी चौकशी करणाऱ्या यंत्रणांसमोर जाण्यास तयार आहे. याप्रकणी मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी दिला.