
बाप्पाच्या आगमनाला अवघे २० दिवस राहिले असतानाही ठाण्यातील ३०० गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्याच मिळाल्या नसल्याचे समोर आले आहे. याविरोधात टीकेची झोड उठल्यानंतर गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात महापालिकेने बैठक घेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासमोरच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पालिकेच्या कारभाराबाबत खडेबोल सुनावले. त्यावर महापौरांनी युद्ध पातळीवर सर्व परवानग्या देण्याचे आश्वासन देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
यंदा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. ठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय परवानग्यांवर चर्चा करण्यासाठी १ महिना आधीच पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना वेळच नसल्याने यंदाची बैठक लांबली. दोन वेळा पत्र देऊनही महापौरांकडून वेळ मिळत नसल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात दैनिक ‘सामना’ने आवाज उठवताच प्रशासनाने अधिसूचना काढत आज बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला पालिका अधिकारी, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, एमएसईडीसीएल, टोरंट पॉवरचे अधिकारी आणि ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्यावर खड्डे असल्याची महापौरांची कबुली
ठाण्याच्या रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या असल्याची स्पष्ट कबुली महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीत दिली. दरम्यान विसर्जन ठिकाणी आपण चांगला रस्ता बनवू शकलो नसल्याची खंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान गणेशोत्सवापूर्वी ही समस्या दूर करू, असे आश्वासन महापौर पिंपळोलकर यांनी दिले. तसेच विसर्जन घाटावर क्रेन उपलब्ध करून देण्याबाबत दहा वर्षांपासून कार्यकर्ते मागणी करत असताना ही सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
– सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महापौर पिंपळोलकर १ तास उशिरा आल्याने उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
– मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी घेताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



























































