
ऑक्टोबरमधील उन्हाच्या तीव्र झळा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिनाही तापदायक राहणार असल्याचे भाकीत हवामानतज्ञांनी केले आहे. प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता वाढली आहे. परिणामी हिवाळ्या तही तापमानवाढ हैराण करणार आहे. नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांना उष्णतेचा तडाखा बसणार आहे.
सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात अत्यंत तीव्र ‘एल निनो’ स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम हिंदुस्थानच्या वातावरणावर जाणवणार असल्याचा सावधगिरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासंदर्भातील ताज्या अंदाजानुसार, हिमालयाच्या लगतचे काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांत नोव्हेंबर महिना अधिक उष्ण ठरणार आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्यामुळे ऑक्टोबरप्रमाणेच उन्हाच्या झळा असह्य करणार आहेत. या तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गुजरात आणि राजस्थानला बसण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील भागांना उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.
राज्याचे किमान तापमान वाढणार
महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात चढउतार सुरू आहे. त्यामुळे थंडीची चाहूल वाटत असली तरी पुढील काही दिवसांत किमान तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होणार असल्याचे हवामानतज्ञांनी म्हटले आहे. हवामान विभागाने नोव्हेंबरच्या अंदाज अहवालात भाकीत केले आहे.
‘एल निनो’चा परिणाम भयानक
‘एल निनो’मुळे पृथ्वीवर तापमान वाढते तर ‘ला निना’मुळे तापमानात घट होते. ‘एनसो’चा एक ‘तटस्थ’ टप्पाही असतो. अत्यंत तीव्र ‘एल निनो’मुळे अनेक भागांतील तापमान व पावसाच्या सामान्य चक्रात व्यत्यय येतो. काही भागांत भीषण दुष्काळ पडू शकतो, इतर भागांत मुसळधार पाऊस आणि पूर येऊ शकतो. तसेच जगाच्या मोठय़ा भागांत उष्णतेचे प्रमाण वाढू शकते, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
































































