
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघात शनिवार (22 ऑगस्ट) पासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. क्वीन्सलँडमधील ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 18 विकेट्स पडल्या. प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा डाव 64 धावांमध्ये गुंडाळला. त्यानंतर दिवस अखेर ऑस्ट्रेलियाचीही 8 बाद 165 अशी अवस्था झाली. ऑस्ट्रेलियाकडे सध्या 101 धावांची आघाडी असून अद्याप सामन्याचे 4 दिवस बाकी आहेत.
डार्विनच्या मरारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पाहुण्या बांगलादेशने चमत्कार करत यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे बांगलादेशने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला होता. या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत जोरदार कमबॅक केले. क्वीन्सलँडमधील ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान तिकडीने अक्षरश: तांडव केले. मिचेल मार्श यात आघाडीवर होता.
मार्शने सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून बांगलादेशच्या फलंदाजांच्या बत्त्या गूल केल्या. पहिल्याच चेंडूवर त्याने इदमान इस्लाम याला बाद केले. त्यानंतर फलंदाज मैदानात येत गेले आणि मार्शने त्यांना परत माघारी पाठवले. मार्शने आघाडीची फळी कापून काढल्यानंतर पॅट कमिन्स आणि हेझलवूड यांनी त्यावर कळस चढवला. एकवेळ बांगलादेशची अवस्था 5 बाद 12 अशी बिकट होती. शेपटाने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने बांगलादेशला 50 धावांचा आकडा ओलांडता आला. मिचेल मार्शने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने 3 आणि हेझलवूडने 1 विकेट घेतली.
Absolute mayhem to start in Mackay!
Catch the #AUSvBAN day one match report: https://t.co/RjHruJ4mKw pic.twitter.com/iib6nYWHzQ
— cricket.com.au (@cricketcomau) August 22, 2026
बांगलादेशचा 64 धावांमध्ये खुर्दा उडवण्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. शोरिफूल इस्लाम यानेही वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना वेसण घातले. तीन वर्षानंतर कसोटी खेळणाऱ्या मॅट रेनशॉला तस्कीन अहमद याने बाद केले. त्या पाठोपाठ ट्रेव्हिस हेड (22) आणि मार्नस लाबुशेनही (4) बाद झाले.
ऑस्ट्रेलिया डाव 3 बाद 41 असा संकटात सापडलेला असताना पुन्हा एकदा स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरून ग्रिन मदतीला धावून आले. दोघांमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. मात्र अनुभवी शोरिफूल इस्लाम याने स्मिथचा अडसर दूर केला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 4 धावांमध्ये 4 विकेट्स गमावल्या. दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या 8 बाद 165 धावा झाल्या होत्या. ग्रिन 51, तर नाथन लायन 10 धावांवर नाबाद आहे. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम याने सर्वाधिक 6, तर तस्कीन अहमद आणि मेहंदी हसन मिराझने प्रत्येक 1 विकेट घेतली. आता दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल.


























































