
भरधाव वेगात जाणाऱ्या इको कारने दोन महिलांना जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी नालासोपाऱ्यातील दत्तनगर भागात घडली. या अपघातात श्रेया मिसाळ (३२) ही महिला ठार झाली असून तिची मैत्रीण प्रगती मोरे गंभीर जखमी झाली आहे. या अपघातप्रकरणी अल्पवयीन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यासह कारमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निमित्ताने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नालासोपारा येथील नगिनदासपाडा परिसरात राहणाऱ्या प्रगती मोरे व श्रेया मिसाळ या दोघी घरकाम करतात. त्या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामाकरिता वसईत गेल्या होत्या. रोजची सर्व कामे आटोपून दोघीजणी नालासोपाऱ्यात आल्या. त्या घरी पायी जात असताना दत्तनगर येथे समोरून भरधाव वेगात इको कार आली आणि या कारने मोरे व मिसाळ यांना जोरात धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दोघीजणी रक्तबंबाळ झाल्या. त्यांना तातडीने नगिनदासपाडा येथील रकिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
श्रेया मिसाळ यांच्या डोक्याला, पाठीला, कंबरेला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा मिसाळ यांचा मृत्यू झाला तर मोरे यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर तुळिंज पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले आहे. दुर्घटनाग्रस्त इको कार राजेश रहा यांच्या मालकीची असल्याचे आढळून आले असून त्यांनी अल्पवयीन चालकाला गाडी चालवायला दिल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.




























































