
नागपूर-पंढरपूर या नॅशनल हायवे क्रमांक 361 वरील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथून जाणाऱ्या नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामातील काही भाग व तुकडे पडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हा पूल नुकताच उभारण्यात आला असताना अशा प्रकारे बांधकामाचे तुकडे निखळत असल्याने पुलाची गुणवत्ता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रकरणी मोठी दुर्घटना व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पुलाची तातडीने स्वतंत्र तांत्रिक तपासणी आणि स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणी मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी बालाजीराव मोरे सोनखेडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा. मोरे सोनखेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लक्षवेधी निवेदन सादर करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पूल बांधून फारसा कालावधी झाला नसतानाही त्याचे भाग निखळणे अत्यंत गंभीर बाब असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. याप्रकरणी पुलाच्या दर्जाची स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेमार्फत चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी ‘केटीएल’ तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच पुलाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करताना दर्जेदार साहित्य वापरून तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
यासोबतच, एनएच-361 च्या कामासाठी हरभरा-सोनखेड तलावातून मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या मुरूम उत्खननाचा मुद्दाही प्रा. मोरे सोनखेडकर यांनी ऐरणीवर आणला आहे. यापूर्वी निर्देश देऊनही या प्रकरणात अपेक्षित महसूलविषयक कारवाई झाली नसल्याचा आरोप करत, तलावातून काढलेला मुरूम, दिलेली परवानगी, भरलेली रॉयल्टी व वाहतूक यांची स्वतंत्र महसूल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शासनाचा महसूल बुडाला असल्यास रॉयल्टी, दंड व नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांकडून वसूल करावी आणि तलावाच्या पर्यावरणाला झालेल्या नुकसानाचीही भरपाई करून घ्यावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. नागरिकांच्या जीविताशी व शासनाच्या महसुलाशी तडजोड न करता प्रशासनाने केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. मोरे यांनी केली आहे.





























































