Little fat black shirt…. बंगळुरूच्या तरुणाची रेस्टॉरंटकडून बॉडी-शेमिंग, कंपनीने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेंगळुरूमधील एका व्यक्तीला रेस्ट्रॉरंटचे बिल तपासताना धक्कादायक अनुभव आला. ग्राहकाच्या नावाऐवजी बिलावर “Little fat black shirt” असा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकारामुळे नाराज झालेल्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर आपला अनुभव शेअर केला असून त्याची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बेंगळुरूतील कोरमंगळा परिसरातील Subko The Craftery या रेस्ट्रॉरंटमध्ये गेला होता. त्याने तेथे जेवण ऑर्डर करून जेवणाचे पैसे भरण्यासाठी बिल मागवले. वेटर बिल घेऊन आला. हे बिल जेव्हा ग्राहकाने पाहिले तेव्हा त्याचा राग अनावर झाला. कारण या बिलावर ग्राहकाच्या तपशीलांमध्ये त्याच्या नावाऐवजी त्याच्या शरीरयष्टी आणि कपड्यांवर आधारित वर्णन लिहिल्याचे त्याला दिसले.

हा बिलाचा फोटो ग्राहकांने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी अशा प्रकारच्या वर्णनाचा वापर करण्याची गरज काय, असा सवाल त्याने उपस्थित केला. ग्राहकाने म्हटले की, नाव, टेबल क्रमांक किंवा ऑर्डरच्या तपशीलांवरून सहज ओळख पटवता आली असती. पुरुष असल्यामुळे शरीरयष्टीवर केलेली टिप्पणी ही विनोद म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

 

View this post on Instagram

 

दरम्यान, Subko Coffee Roasters ने या प्रकरणावर Instagram वर सार्वजनिक माफी मागितली. लठ्ठपणावरून हिणवणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करत रेस्टॉरंटने संबंधित ग्राहकाला आपल्या अंतर्गत तक्रार समिती (ICC) शी संपर्क साधण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील, यासाठी आम्ही माफी मागतो,” असेही रेस्टॉरंटने आपल्या निवेदनात म्हटले.

या पोस्टनंतर Reddit वर वापरकर्त्यांमध्ये चर्चा रंगली. काहींनी हा कर्मचाऱ्यांचा अयोग्य विनोद असल्याचे म्हटले, तर काहींनी ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या शरीरयष्टीचा उल्लेख करणे पूर्णपणे चूकीचे असल्याचे म्हटले आहे. काहींनी तक्रार फेटाळून न लावता चूक सार्वजनिकरीत्या मान्य केल्याबद्दल आणि त्याची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल ‘सबको’ (Subko) या रेस्टॉरंटचे कौतुक केले. मात्र, या घटनेमुळे ग्राहकांशी संवाद साधताना कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता आणि आदर राखण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.