Ratnagiri News – जनतेशी सतत संपर्कात रहून पक्ष संघटन मजबूत करा; सुभाष देसाई यांच्या शिवसैनिकांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षसंघटन मजबूत करा, एखादी समस्या लहान असतानाच ती सोडवा. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जनतेशी सतत संपर्कात रहावे. पक्षपातळीवर महिन्यातून एक बैठक घ्यावी. तालुकास्तरावर एक बैठक व्हावी.तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हापातळीवर महिन्यातून एक बैठक घ्यावी. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मन जुळली की पक्ष संघटन मजबूत होते, असा विश्वास शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.चिपळूण येथील माटे सभागृहात आयोजित माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या संघटनात्मक बैठकीत बोलत होते.

आमदार भास्कर जाधव हे चांगले काम करत आहेत.अनेक मंत्री सभागृहात फिरकत नाहीत.पण भास्कर जाधव अधिवेशनात तळ ठोकून बसतात तेव्हा अध्यक्षांचेही लक्ष त्यांच्याकडे असते.ते काय प्रश्न विचारतील यांचा अंदाज नसतो.तुम्ही भास्करारावांसारखे काम करण्याचे ठरवा. पुढच्या तीन वर्षात राज्यात सत्ता नक्की मिळेल असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चिपळूण येथे पार पडली.यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शिवसैनिकांना पेटून उठा सांगताना आक्रमकपणे काम करण्याचा सल्ला दिला.शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून पक्षाची भूमिका आणि विचार समजावून सांगावेत.जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला तर निवडणुकीच्या काळात मत द्या, असे सांगण्याची वेळ येणार नाही.रिक्त पदाधिकारी नेमणूक आणि मतदारायाद्यातील गायब झालेली नावे पुन्हा नोंदवून घेण्याबाबत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी सुभाष देसाई यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.पुढे आमदार जाधव म्हणाले की,राजकीय परिस्थिती बदलत असली तरी शिवसेना नव्या जोमाने उभी राहिली नवीन नेतृत्व आपण त्या करू हेच उद्याचे भविष्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपनेते विजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या कामाला गती देण्याची मागणी केली.दर महिन्याला बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घ्या.शिवसेना पक्षाची भूमिका, विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा.नकारात्मक सोडून सर्वांनी सकारात्मक व्हावे असे आवाहन विजय कदम यांनी केले.

जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव,तालुकाप्रमुख सचिन बाईत,अंकुश काते,सचिन निकम,सुभाष जाधव व चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील पक्षाचे विविध सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.