
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
हे कोकिल क्षपय कालमलालसत्वं वाचंयमत्वमवलम्ब्य कियद्दिनानि।
श्रीखण्डशैलसुहृद प्रसरन्ति यावत्ते वायव सहचराः सहकारलक्ष्म्याः।।
हे कोकिळे, उदास न होता काही दिवस मौन धारण कर आणि हा प्रतिकूल काळ कसाबसा घालव; कारण मलयाचलाचे मित्र असलेले सुगंधी वसंत वारे, आम्रमंजिरीच्या शोभेला सोबत घेऊन, लवकरच वाहू लागणार आहेत.
श्लोकात कवी कोकिळेला सांगतो, ‘तुझा खरा काळ अजून आलेला नाही.’ त्यामुळे आत्ता उतावीळ होऊन कूजन करू नकोस. काही दिवस शांत राहा. ‘वाचंयमत्वम् अवलम्ब्य’ म्हणजे वाणीवर संयम ठेवून, मौन स्वीकारून राहा. पण हे मौन कायमचे नाही. परिस्थिती बदलणार आहे. प्रतिकूल काळात अस्वस्थ होऊन स्वतला सिद्ध करण्याची घाई करण्यापेक्षा योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणे अधिक शहाणपणाचे. काळ अनुकूल झाला की आपल्या गुणांना योग्य वातावरण आपोआप मिळते.



























































