
भारतीय समाजजीवनात मिथकं भिनली आहेत. मुळात भारतीय समाजाची तात्विक, नैतिक मूल्येच मिथकांच्या वळणाने उभी राहिली आहे. मिथककथांचे संवादी आणि प्रवाही रूप वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून आपण अनुभवले आहे. भारतीय मिथकांना समकालीन संवेदनेतून नव्याने पाहणाऱ्या लेखिका अरुणा ढेरे यांचे ‘उत्तरपर्वात एकदा आणि इतर मिथक कथा’ हे नवीन पुस्तक मिथकांचा वेगळा अनुभव देते. पद्मगंधा प्रकाशनाद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. मिथक म्हणजे नद्यांसारखी जुनी, खोल पात्रं. शेकडो वर्षे त्यात नवीन अर्थ भरत राहतात. कधी अखंड वाहतात, कधी कोरड्या पडतात, आणि कधी सामूहिक स्मृतींच्या पावसाने पुन्हा तुडुंब भरून फेसाळतात. ‘उत्तरपर्वात एकदा आणि इतर मिथक कथा’ या संग्रहात अरुणा ढेरे यांनी भारतीय मिथकांना समकालीन संवेदनेतून नव्याने पाहिले आहे. पुरातत्त्व, मानसशास्त्र आणि साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मिथकांचा अनुभव रसाळ कथांमध्ये साकार केला आहे. अरुणा ढेरे या कथासंग्रहात भारतीय मिथकांचे बोट पकडून आपल्याला त्या अंधाऱ्या पात्रात खोलवर घेऊन जातात. इथे मिथक हा केवळ संशोधनाचा विषय नाही, तर तो एक जिवंत, स्पंदनशील अनुभव आहे. प्राचीन आणि आधुनिक यांच्या सीमेवर उभ्या असलेल्या या कथा वाचताना आपल्याला मानवी जीवनाचे सुख-दुःखमय रस्य नव्या अर्थाने उलगडत जाते.




























































