नवल अरुण – सालुमारादा थिम्माक्का!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Saalumarada Thimmakka

वटवृक्षासारखंच दीर्घायुष्य लाभलेल्या आणि कार्यविशालतेचं रोपण करणाऱ्या ‘सालुमारादा’ थिम्माक्का! यातलं ‘सालु’ म्हणजे रांग आणि ‘मारा’ म्हणजे झाडं. झाडांची रांग निर्माण करणाऱ्या म्हणून थिम्माक्कांना नाव पडलं ‘सालुमारादा थिम्माक्का.’ वनीकरण, शहरी वनीकरण असे सरकारी शब्द अस्तित्वात येण्याआधीपासून थिम्माक्का यांनी वडाची झाडं लावण्याचं व्रत घेतलं होतं. त्यांच्यासाठी प्रत्येक तिथी ‘वटपौर्णिमा’च होती आणि त्यांनी लावलेले बालवड पुढे महावृक्षात रूपांतरित होऊन पारंब्यांचा लडिवाळ खेळ करत दिसामासी वाढत होते. आभाळाला भिडत होते आणि धरित्रीला स्पर्शत होतो.

30 जून 1911 ते 14 नोव्हेंबर 2025 असं 114 वर्षांचं वटवृक्षासारखंच विशाल जीवन थिम्माक्का यांना लाभलं. आपल्या दीर्घायुष्यात त्यांनी दीर्घकाळ साक्ष देईल असं निसर्गसंवर्धनाचं कार्य केलं. साडेचार किलोमीटर लांबीची 385 वडांची रांग त्यांनी रुजवली, वाढवली. त्यांचे पती चिक्कय्या यांनासुद्धा या कार्यात रस होता. हे निसर्गप्रेमी दाम्पत्य एका आगळ्यावेगळ्या ऊर्जेने आणि उमेदीने सुरुवातीच्या 10 वटरोपांसह या कार्यात उतरलं. त्या झाडांबरोबरच त्यांचा उत्साहसुद्धा वाढत गेला. कर्नाटकातल्या कुडूर या खेड्यात या ‘प्लॅन्टेशन’चा आरंभ झाला. मग दुसऱ्या वर्षी 15, तिसऱ्या वर्षी 20 असं करता करता वडांची रांग वाढू लागली. आधीची उंचावलेली झाडं सावली देऊ लावली. एकीकडे शहरीकरण वाढतच होतं. एकदा तर एका महामार्गासाठी थिम्माक्का आणि चिक्कय्या या जोडप्याने रुजवलेले काळजी घेऊन वाढवलेले 70 वटवृक्ष तोडण्याचं संकट आलं. थिम्माक्का आज्जी सरळ मुख्यमंत्र्यांकडे गेल्या. रस्त्यात बदल झाला. वडाची झाडं वाचली. आपली 385 तरुण तगडी वृक्ष बाळं न्याहाळताना थिम्माक्कांना आनंद होऊ लागला.

अवघ्या चार यत्ता (इयत्ता) शिकलेली ही माणसं. पण पठडीच्या पलीकडचं शिक्षण त्यांना अनुभव देतो आणि उपजत सुज्ञपणावर जगातला कोणत्याही प्रकारचा चांगुलपणा जगत असतो. इतरांना जगवत असतो. थिम्माक्कांच्या या कार्याची दखल, त्यांच्या उत्तरायुष्यात जगाने घेतली. 2019 मध्ये शास्त्रज्ञ राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना ‘पद्मश्री’ मिळावी हा सुंदर योगायोग. कारण थिम्माक्का जन्मजात विज्ञानवादी होत्या!