
गोरेगावच्या उन्नतनगर येथील ‘नूतन विद्यामंदिर’ संचलित महाराष्ट्र विद्यालयाने 20 वर्गखोल्यांची खरेदी किंमत भरूनही ‘म्हाडा’ने आता हा भूखंड परस्पर विकायला काढून गोरगरीबांच्या शिक्षणावरच घाला घातला आहे. यामुळे शाळा व्यवस्थापनाने आता न्यायालयात धाव घेतली आहे. ‘म्हाडा’च्या या दंडेलशाहीविरोधात शाळेतील विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नूतन विद्या मंदिर संस्थेची स्थापना 1964 मध्ये मालिनी उपाध्ये आणि राजाभाऊ उपाध्ये यांनी केली. संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून 1965 पासून ‘म्हाडा’च्या प्लॉट क्र. 45 वरील 20 खोल्यांमध्ये शाळेचे वर्ग भरविले जात होते. ‘म्हाडा’सोबत अनेक वर्षे पत्रव्यवहार केल्यानंतर प्राधिकरणाने सदर 20 वर्गखोल्या संस्थेला विकण्यास मान्यता दिली. नोव्हेंबर 2006 मध्ये संस्थेने या वर्गखोल्यांच्या खरेदीपोटी 11 लाख 20 हजार 90 रुपये अदा केले. 18 सप्टेंबर 2019 रोजी संबंधित कालावधीसाठी सेवा शुल्क आणि विलंब शुल्कापोटी 31.38 लाखांची अतिरिक्त रक्कम अदा केली, असा संस्थेचा दावा आहे. दरम्यान, शाळेच्या उपक्रमांची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी शाळेच्या समोरच असलेला प्लॉट क्र. 48 हा आणखी एक भूखंड संस्थेला दिला. 2012 मध्ये संस्थेने या भूखंडावर शाळेची चारमजली नवी इमारत उभारली आणि जुन्या भूखंडावरील 20 खोल्यांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाकडे परवानगी मागितली. मात्र, ही परवानगी म्हाडाकडून देण्यात आली नाही, असे संस्थेने म्हटले आहे.
‘म्हाडा’च्या विक्री निविदेला स्थगिती द्या
या प्रकरणी नूतन विद्या मंदिर या संस्थेने अॅड. विवेक गोठीवरेकर यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शाळेच्या जागेचा ताबा पूर्ववत देण्यात यावा, पाडलेल्या 20 खोल्यांची पुनर्बांधणी करावी आणि म्हाडाच्या ई-निविदेला स्थगिती द्यावी, अशी मागणी संस्थेने याचिकेतून केली आहे.
म्हाडाने 12 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या विविध सुविधा भूखंडांच्या भाडेपट्टय़ासाठीच्या ई-निविदेत शाळेच्या भूखंडाचा समावेश केला. अशाप्रकारे म्हाडाने यापूर्वी विकलेल्या आणि भाडेपट्टय़ावर असलेल्या गाळे व जागेचे पुन्हा आर्थिक मूल्यांकन करून मीरा रोड येथील एका संस्थेला 45 कोटी रुपयांना विकण्याचा घाट घातला. निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी संस्थेने संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही – अनिल देसाई, सचिव, नूतन विद्या मंदिर
24 तासांची नोटीस देऊन गाळे जमीनदोस्त
वर्गखोल्यांच्या खरेदीपोटी रक्कम भरली असतानादेखील 12 मार्च 2024 रोजी ‘म्हाडा’ने 25 एप्रिल 1984 च्या परिपत्रकाचा दाखला देत 24 तासांची नोटीस देऊन 20 खोल्या रिक्त करण्याची संस्थेला नोटीस बजावली. त्यानंतर 19 मार्च 2024 रोजी खोल्यांचा ताबा घेतला. जून 2024 च्या सुमारास खोल्या पाडण्यात आल्याचा आरोप संस्थेने केला आहे.




























































