गोवंडी शताब्दी रुग्णालयात रुग्णांची होतेय गैरसोय; नव्या हॉस्पिटलचा कृती आराखडा जाहीर करा, शिवसेनेची पालिकेकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सद्यस्थितीत पुरेसे डॉक्टर नाहीत. कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून सोयीसुविधांचीही कमतरता आहे. असे असताना पालिकेने ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ तत्त्वावर नवीन रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे नव्या रुग्णालयात गोरगरिबांना मोफत सुविधा मिळणार का, कोणकोणत्या सुविधा मिळणार आणि सेवासुविधांची अंमलबजावणी कशी होणार, याचा सविस्तर कृती आराखडा जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या नूतनीकरणात ५८० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. मात्र आधीच रुग्णालयांत सोयीसुविधांची वाणवा असताना नव्या रुग्णालयाचे नियोजन कसे असणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण पालिकेने अद्याप दिलेले नाही. त्यामुळे नवीन रुग्णालयात गोरगरीब-गरजू रुग्णांना किती खाटा राखीव असतील याची माहिती देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांना निवेदन दिले असून तातडीची विशेष बैठक घेण्याची मागणी केली आहे.

‘पीपीपी’ धोरणामुळे गोरगरीब रुग्ण मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, अशी मागणीही पाटणकर यांनी पालिकेकडे केली आहे.