
चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी आणि खोकल्याची काही औषधे देण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलेफ्राइन हायड्रोक्लोराइडच्या संयोगाने बनवलेली सर्व औषधे चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नये, असा आदेश सरकारने जारी केला आहे. सिनारेस्ट, फेब्रेक्स, टी-मिनीक या नावाच्या औषधांमध्ये या संयोगाचा वापर होतो. औषध कंपन्यांना या औषधांच्या पॅकेटवर, आतील माहितीवर आणि जाहिरात सामग्रीवर स्पष्ट इशारा लिहिण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे औषध देऊ नये, असे या पाकिटांवर स्पष्टपणे लिहावे लागणार आहे. तज्ञ समिती आणि ड्रग टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाच्या शिफारशीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.




























































