अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील टेनेसी राज्यात एका हिंदुस्थानी वंशाच्या दुकानदाराची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोराने गोळीबार केला तेव्हा त्यांची १९ वर्षांची मुलगी शेजारीच उभी होती आणि तिच्या डोळ्यांदेखतच हा संपूर्ण प्रकार घडला. हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने दुकानात घुसला होता.

मूळचे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुरेश पटेल यांचे जॅक्सन शहरात ‘रिजक्रेस्ट सेलर्स वाइन अँड स्पिरिट्स’ हे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, एक मास्क घातलेल्या व्यक्तीने दुकानात प्रवेश केला, बंदूक रोखून पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी पैसे दिल्यानंतरही हल्लेखोराने सुरेश पटेल यांच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.