
यवतमाळमधील झरी तालुक्यातील अडकोली गावाजवळील जंगल परिसरात झरी ते वणी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाघाचे दर्शन झाले. अडकोली येथील बसस्थानकापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर वाघ दिसल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वाघाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
झरी जामणीहून वणीच्या दिशेने बस जात असताना अडकोली गावाजवळ रस्त्यालगतच्या जंगलात वाघ आढळून आला. बसमधून प्रवास करणाऱ्या अडकोली येथील प्रवाशांना वाघ दिसताच त्यांनी बसच्या खिडकीतून मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. अडकोली बसस्थानकापासून इतक्या कमी अंतरावर वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे वाघाचा वावर लक्षात घेता वनविभागाने परिसरात गस्त वाढवून आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, जंगल परिसरातून प्रवास करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने करणे गरजेचे आहे.





























































