
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. सामन्यावर टीम इंडियाने पहिल्याच दिवशी चांगली पकड निर्माण केली आहे. देवदत्त पडिक्कलने शतक ठोकलं तर कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक ठोकलं. त्यामुळे संघ मजबूत स्थितीत आहे. मात्र, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने संघाची डोकेदुखी वाढवलीये.
श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू कुमाराचा शॉर्ट बॉल हातावर लागल्यामुळे दुखापतग्रस्त होऊन पंत अवघ्या 3 धावांवर मैदान सोडून बाहेर गेला. त्यामुळे संघाची दाखदूख काहीशी वाढली होती. फिजिओने त्याच्या हातावर बर्फ लावून उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेदना कमी न झाल्यामुळे त्याला शेवटी मैदान सोडून बाहेर जाव लागलं. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत पंत काही मैदानात परतला नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात पंतच्या दुखापतीसंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत एक दिलासादायक अपडेट दिली असून, तो सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, टीम इंडियाने पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पाच विकेट गमावत 300 धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वी जयसवाल (43), केएल राहुल (13) लवकर बाद झाल्यामुळे संघ काहीचा अडचणीत सापडला होता. मात्र, मधल्या फळीत देवदत्त पडिक्कल (117) आणि कर्णधार शुभमन गिल (50) यांनी संघाचा डाव सावरला. त्यानंतर रविंद्र जडेजाने (43) धावसंख्येत काहीशी भर घातली. सध्या ध्रुव जुरेल (07) आणि सारांश जैन (04) फलंदाजी करत आहे.
























































