दीड महिन्यापूर्वी पडलेले झाड अद्याप हटविले नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेट येथील आसावरी व विभावरी या सरकारी निवासस्थानी इमारतीच्या मध्यभागी असलेल्या गार्डनमधील मोठे झाड दीड महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उन्मळून पडले. उन्मळून पडलेले हे झाड अद्याप त्याच स्थितीत असून तेथे साफसफाई झालेली नाही. त्यामुळे वयोवृद्ध व लहान मुलांची गैरसोय होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीत मुंबई सत्र न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश तसेच सनदी अधिकारी राहतात.

या इमारतींची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. 3 जुलैच्या मुसळधार पावसात हे झाड उन्मळून पडले. त्याची माहिती या विभागाला देण्यात आली. वारंवार त्याचे स्मरण करून देण्यात आले. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफसफाईसाठी काहीही कार्यवाही केलेली नाही. या झाडाचा भाग येथून तातडीने काढावा व साफसफाई करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.