
एखाद्या कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसल्यास ती शोधण्याची सक्ती करता येणार नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयुक्तांचे आदेश रद्द केले.
बॉम्बे स्टॉक मार्केटमधील कारभाराची माहिती सेबीकडे माहिती अधिकारात मागितली गेली. ही माहिती उपलब्ध नसल्याचे सेबीने सांगितले. याविरोधात केंद्रीय माहिती आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला. केंद्रीय माहिती आयुक्तांनी संबंधित माहिती देण्याचे आदेश दिले. या आदेशाला सेबीने याचिकेद्वारे आव्हान दिले. न्या. मनीष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एखादी माहिती उपलब्ध नसल्यास अर्जदाराचे समाधान करण्यासाठी ती माहिती शोधून द्यावी, अशी सक्ती त्या कार्यालयावर किंवा आस्थापनेवर करता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका मंजूर केली.
माहिती मागता येऊ शकते
एखादी माहिती दुसऱ्या कार्यालयाकडे उपलब्ध असल्यास ती देण्याची विनंती केली जाऊ शकते. मात्र जी माहिती उपलब्धच नाही ती शोधण्याची किंवा मिळवण्याचा आग्रह कोणत्याच कार्यालयावर केला जाऊ शकत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.





























































