
डिजिटल होम सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यव्यापी धोरण आणा अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने महिला आयोगाकडे केली आहे. महिला ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या सेवेसाठी पुरुषांची नेमणूक केली जात असल्याची तक्रार मिळताच संघटनेने आक्रमक भूमिका घेत निवेदनाद्वारे ही मागणी केली.
एका महिला ग्राहकाने हेअर स्पासाठी डिजिटल होम सर्व्हिस प्लॅटफॉर्म अर्बन कंपनीकडून घरपोच सेवा मागितली होती. मात्र कंपनीने महिलेच्या पूर्वपरवानगीशिवाय एका पुरुष कर्मचाऱ्याची नेमणूक केली. याबाबत तक्रार मिळताच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने कंपनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. मात्र कंपनीने लेखी उत्तर दिले नाही आणि माफी मागण्यासाठी टाळाटाळ केली. या पार्श्वभूमीवर आक्रमक शिवसैनिकांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवाडे यांची भेट घेऊन महिलांना घरपोच सेवा देताना निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी कक्षाचे उपाध्यक्ष अशोक शेंडे, सरचिटणीस निखिल सावंत, कार्यकारिणी सदस्य संजय पावले, अॅड. अभिराज परब, विजय पवार, कृष्णकांत शिंदे, विक्रम शाह, अॅड. उपेंद्र लोकेगावकर, त्रिवेणी वाळकर, राधिका शर्मा, शेखर यादव, संतोष हिनुकले आणि महिला आयोगाच्या अधिकारी सुनीता गणगे आदी उपस्थित होते.





























































