
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) 16 हायस्पीड रेल्वे चालकांना जपानमध्ये एक वर्षाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. बुलेट ट्रेन चालकांची नियुक्ती अ-कार्यकारी (एन ई) – 4 श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. 16 चालकांसह प्रकल्पाशी संबंधित सुमारे 260 कर्मचाऱ्यांना जपानी भाषा, संस्कृती, तंत्रज्ञान, सुरक्षा मानके आणि कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
जगातील सर्वात पहिली बुलेट ट्रेन जपानमध्ये धावण्यास सुरुवात झाली. जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशातील पहिला 508 किमीचा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. भविष्यात गुजरातमधील वापी ते साबरमती बुलेट ट्रेन प्रकल्प डिसेंबर 2027पर्यंत आणि मुंबई ते साबरमती प्रकल्प डिसेंबर 2029पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जपानी शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी केवळ चालकच नव्हे, तर इतर कर्मचाऱ्यांनाही जपानी कार्यसंस्कृतीशी परिचय व्हावा यासाठी सुमारे 260 कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत.
508 किमी मार्गासाठी तीन आगार
मुंबई-अहमदाबाद 508 किमी मार्गावरील बुलेट ट्रेनच्या रेकची नियमित तपासणी व दुरुस्तीसाठी ठाणे, सुरत आणि साबरमती असे तीन आगार उभारण्याचे काम सुरू आहे. या आगारांमध्ये आपत्कालीन देखभाल, गाडय़ांचे री-प्रोफाइलिंग, रेकची दुरुस्ती, उपकरणे आणि बोगींच्या देखभालीसाठी स्वतंत्र वर्कशॉप उपलब्ध असतील.
भाषा प्रावीण्य परीक्षा प्रमाणपत्र
एनएचएसआरसीएलमधील अनेक अधिकाऱ्यांनी जपानी भाषा प्रावीण्य परीक्षा देऊन एन-वन ते एन-फाइव्ह या विविध स्तरांपर्यंतची प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. त्यांना 40 हजार ते 1.25 लाख रुपयांची औद्योगिक महागाई भत्ता वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. याशिवाय एनएचएसआरसीएलच्या नियमानुसार विविध भत्ते व इतर लाभ मिळणार आहेत.





























































