
निवडणूक आयोगाचा कर्मचारी असल्याचे भासवून ठगाने वृद्धाला एपिके फाईल पाठवून बँक खात्यावर डल्ला मारला. ठगाने मोबाईलसह बँक खाते हॅक करून दहा लाख रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केले. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मतदान अपडेट (एसआरआय)चे काम सुरू आहे. त्याचा फायदा ठगाने घेऊन नागरिकाची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी माहीम येथे अशाच प्रकारे एकाची फसवणूक झाली होती. ती घटना ताजी असतानाच अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची घटना अंधेरी येथे घडली. तक्रारदार हे अंधेरी येथे राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना एका नंबरवरून मेसेज आला. ते कामात व्यस्त असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष दिले नव्हते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी त्या मेसेजमधील दिलेल्या नंबरवर संपर्क केला तेव्हा ठगाने तो निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन कट केला. काही वेळाने त्यांना एका नंबरवरून व्हिडीओ कॉल आला.
ठगाने त्यांना लिंक पाठवून माहिती अपलोड करण्यास सांगितली. तसेच त्यांना बोलण्यात गुंतवून आधार कार्ड आणि मतदान कार्डची माहिती जाणून घेतली. त्यानंतर ठगाने त्यांना पाच रुपयांचा फॉर्म भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार त्यांनी क्रेडिट कार्डवरून पैसे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पैशांचा व्यवहार झाला नाही. ठगाने त्यांचा फोन होल्डवर ठेऊन त्यांना एक एपिके फाईल पाठवली. ती फाईल ओपन करून पुन्हा पैसे भरण्याचा सल्ला दिला. त्यांनी पैशांचा व्यवहार केला. मात्र पैसे गेले नाही. ठगाने तक्रारदार यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मोबाईलसह बँक खात्याचा कंट्रोल स्वतःकडे घेऊन काही ऑनलाईन व्यवहार केले. दोन क्रेडिट कार्डवरून दहा लाख रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाले. बँकेतून ऑनलाईन व्यवहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.





























































