
बॅडमिंटनच्या महासत्तांच्या गर्दीत फ्रान्सने नवी दिल्लीच्या कोर्टवर सुवर्णक्रांती घडवली. अवघ्या 21 वर्षांच्या अॅलेक्स लॅनियरने पुरुष एकेरीचे विश्वविजेतेपद पटकावत फ्रान्सला या प्रकारातील पहिले विश्वविजेतेपद मिळवून दिले. एवढेच नव्हे, तर थॉम गिकेल-डेल्फिन डेलरू जोडीने मिश्र दुहेरीतही सुवर्ण मिळवून दिल्याने फ्रान्सने अखेरच्या दिवशी दुहेरी सुवर्णाचा अनोखा इतिहास रचला.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर नवव्या मानांकित लॅनियरने जपानच्या कोदाई नाराओकाचा 21-11, 21-11 असा धुव्वा उडवला. सुमारे 50 मिनिटांत संपलेल्या या सामन्यात लॅनियरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत नाराओकाला प्रतिकाराची संधी दिली नाही. दमदार स्मॅश, अचूक प्लेसिंग आणि भन्नाट कोर्ट कव्हरेजच्या जोरावर त्याने थेट सुवर्णपदकावर झडप घातली. उपांत्य फेरीत कॅनडाच्या व्हिक्टर लायने पहिला गेम जिंकून लॅनियरला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर फेंच खेळाडूने 21-13, 21-14 असे पुढील गेम जिंकत अंतिम फेरी गाठली. संपूर्ण स्पर्धेत त्याने केवळ दोन गेम गमावले.
अॅन से–यंग पुन्हा जगज्जेती
दक्षिण कोरियाची जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अॅन से-यंगने महिला एकेरीत दुसरे विश्वविजेतेपद पटकावले. तिने जपानच्या अकाने यामागुचीचा 21-17, 21-14 असा पराभव केला. 2023 मध्ये पहिले विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर अॅनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णही जिंकले होते. गत विश्व अजिंक्यपदात कांस्य पदकावर समाधान मानावे लागल्यानंतर तिने या वेळी पुन्हा जगाच्या शिखरावर झेप घेतली.
फ्रेंच जोडीचा चीनला दणका
थॉम गिकेल-डेल्फिन डेलरू जोडीने मिश्र दुहेरीत चीनच्या अव्वल मानांकित फेंग यान झे-हुआंग डोंग पिंग जोडीला 22-20, 19-21, 21-15 असे हरवत सुवर्ण पटकावले. 1 तास 18 मिनिटांच्या झुंजीत फ्रेंच जोडीने निर्णायक क्षणी संयम राखत बाजी मारली. फ्रान्सचे मिश्र दुहेरीतील हे पहिले विश्वविजेतेपद ठरले.




























































