पेणच्या शेतजुई पतसंस्थेत साडेतीन कोटींच्या ठेवींवर डल्ला; अध्यक्षांसह तिघांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण तालुक्यातील शेतजुई येथील स्वराज्य ग्रामीण बिगरशेती शेतजुई पतसंस्थेमध्ये तीन कोटी ८३ लाख ५१ हजार रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हा घोटाळा उघड झाल्याने सर्वसामान्य ठेवीदार हादरून गेले असून पै पै करून जमा केलेली पुंजी परत मिळेल का, या भीतीने सर्वजण हवालदिल झाले आहेत.

स्वराज्य ग्रामीण बिगर शेती शेतजुई पतसंस्थेत २८ मार्च २०१२ ते ०८ डिसेंबर २०२२ या कालावधीत साधारण तीन कोटी ८३ लाख ५१ हजार २६१ रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबत २२ ऑगस्ट रोजी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये चेअरमन प्रणय सावंत (५६), सचिव संजीवन पाटील (५८), व्यवस्थापक प्रदीप कोळंबेकर (५७) यांना अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांना ठेवींवर ११ टक्के व्याजदराने परतावा करण्याचे प्रलोभन देऊन मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या होत्या. मात्र आरोपींनी बनावट नोंदी करून ३ कोटी ८३ लाख ५१ हजार २६१ रुपयांची अफरातफर केली आहे.