
संडे धमाल करण्यासाठी खोपोलीच्या केपी धबधब्यावर आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांनी आज मुंबई-पुणे रेल्वे ट्रॅकवर धिंगाणा घातला. धबधब्याजवळील रेल्वे ब्रीजवर चढून ट्रॅकवरच तरुण-तरुणींनी रिल्स काढली. तसेच सेल्फी घेण्यात अनेकजण मश्गूल झाले होते. पण ही मौजमजा जीवावर बेतली असती. एखादी गाडी भरधाव वेगात आली असती तर अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. दरम्यान या हुल्लडबाज पर्यटकांना वेळीच आवरा, अशी मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.
पावसाळ्यात खोपोलीचा केपी धबधबा अनेक पर्यटकांना साद घालत असतो. येथील खोल दरी, मन प्रसन्न करणारी हिरवाई आणि फेसाळता धबधबा अनुभवण्यासाठी दर शनिवारी, रविवारी मुंबई, पुणे येथून मोठ्या संख्येने तरुणाई येते. आज सकाळपासूनच असंख्य पर्यटक धबधब्यावर आले होते. येथे मौजमजा केल्यानंतर त्यांतील काहीजण धबधब्यापासून जवळच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर गेले. कर्जत ते लोणावळादरम्यानचा बोरघाटातील हा रेल्वे मार्ग असून पर्यटकांनी अक्षरशः धिंगाण घातला. कोणी सेल्फी घेण्यात व्यस्त होते तर कोणी रिल्स काढीत होते. खाली खोल दरी असून एखादी मालगाडी किंवा मेल-एक्स्प्रेस आली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
वर्षभरात केली दहाजणांची सुटका
धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांना पोलीस वारंवार धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करीत असतात. तरीही अनेक पर्यटक छुप्या मार्गाने जातात व स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. आम्हाला दर शनिवार व रविवारी मदतीसाठी कॉल येतो, असे खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दैनिक ‘सामना’ शी बोलताना सांगितले. या वर्षात आतापर्यंत किमान १० वेळा अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
वेळीच आवरा
पर्यटकांच्या मनमानीमुळे दिवसेंदिवस केपी धबधबा हा डेंजर बनत चालला आहे. ४ ऑगस्ट रोजी ठाण्याचा अभिषेक कुसवाह याचा केपी धबधब्यात पडून मृत्यू झाला. तर ९ जुलै रोजी त्याच ठिकाणी तिघेजण गंभीर जखमी झाले. या घटना घडल्या असतानाही पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवून धबधब्यावर तसेच रेल्वे ट्रॅकवर हुल्लडबाजी करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा बेजबाबदार पर्यटकांना वेळीच आवरा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन पर्यटकांनी धिंगाणा घालणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विहारी, ठाकूरवाडीतील आदिवासी तरुण व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच मदतीला धावून जात असतात. पण पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये म्हणून सूचना फलक लावण्याची गरज आहे.
प्रवीण शिंदे (शहरप्रमुख, खोपोली)





























































