धक्कादायक! हरयाणात पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या; पोट फाडून आतडी काढली बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील कुरुक्षेत्र येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पत्नीने पतीवर चाकूने सपासप वार करून त्याचे पोट फाडले आणि आतडी बाहेर काढली. दरम्यान, घरमालक घटनास्थळी पोहोचताच घाबरलेल्या महिलेने थेट घराच्या गच्चीवरून खाली उडी मारली.

राजेश (वय ४०) असे मृत पतीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचे रहिवासी होता आणि येथे पाणी पुरवठ्याचे काम करत होता. राजेश हा त्याची पत्नी विमला सोबत गेल्या एका वर्षापासून कुरुक्षेत्र येथे भाड्याने राहत होते.

21 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास राजेश आणि विमला यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. दोघांचा आरडाओरडा ऐकून घरमालक रिंकू वरच्या मजल्यावर गेला. तिथे पोहोचताच त्यांना राजेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, तर विमला त्याची आतडी एका पिशवीत भरत होती.

हा भयंकर प्रकार पाहून रिंकू यांना धक्का बसला. घरमालकाला समोर पाहताच विमला घाबरली आणि तिने गच्चीवरून थेट खाली उडी मारली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन अहवालानुसार, राजेशच्या पोटावर तब्बल ३५ सेंटीमीटर लांबीची गंभीर जखम आढळून आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले तीन चाकू जप्त केले आहेत.

घरमालक रिंकू याने दिलेल्या माहितीनुसार, विमला जादूटोणा किंवा अंधश्रद्धेच्या गोष्टी करायची त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. या दोघांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली होती, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पती-पत्नीमधील वाद आणि या भयंकर कृत्यामागील कारणांचा पोलीस कसून तपास करत आहेत.