
गिरीज-डोंगरी परिसरात शनिवारी रात्री उशिरा हिट ॲण्ड रनची घटना घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना कार्डिनल ग्रेसीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. दरम्यान फरार कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
अर्नाळा-वसई मार्गावरील गिरीज-डोंगरी परिसरात असलेल्या रोझ केक शॉपसमोर शनिवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. वेगाने जाणाऱ्या कारचालकाने दुचाकीवरील महिलेला जोरदार धडक दिली. ती एवढी भीषण होती की, बाइकचालक व तिच्या मागे बसलेली महिला अशा दोघीही खाली कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.




























































