
निवडणूक आयोगाच्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. SIR प्रक्रियेमुळे देशातील पात्र प्रौढ लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे. ही संख्या जवळपास 10 कोटी इतकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंजाबमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान स्वतःचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करताना आलेल्या अडचणींचा अनुभव माजी राजदूत नवदीप सुरी यांनी सोशल मीडियावर शेअर केला. सुरी हे इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे राजदूत तसेच ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा दाखला देत चिदंबरम यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर टीका केली.
चिदंबरम यांनी सुरी यांच्या पोस्टचा संदर्भ देत म्हटले की, SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतातील 10 टक्के प्रौढ लोकसंख्या कायदेशीर नागरिक असेल; मात्र त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार नसेल. ही संख्या जवळपास 10 कोटी इतकी आहे. निवडणूक आयोगाने ‘मतदान न करणारे नागरिक’ अशी एक नवीन श्रेणीच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, नवदीप सुरी यांनी पंजाबमधील SIR प्रक्रियेतील आपला अनुभव सांगताना म्हटले की, ते संबंधित बूथ लेव्हल ऑफिसरकडे (BLO) गेले होते. त्यांनी आपले मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड सादर केले. त्यावेळी सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर एका स्वयंसेवकाकडून त्यांना संदेश मिळाला की, 2003 मध्ये झालेल्या SIRशी संबंधित नोंदींमध्ये त्यांच्या काही तपशीलांचा मेळ बसत नाही. सुरी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, 2003 मध्ये ते लंडनमध्ये नियुक्तीवर होते आणि त्यामुळे त्या वेळी झालेल्या मतदार यादीच्या पुनरावलोकनात ते सहभागी झाले नव्हते.
यानंतर त्यांनी BLOशी संपर्क साधला असता, त्यांना नोटीस घेण्यासाठी कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. तसेच भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी काही कागदपत्रे घेऊन पुन्हा येण्यास सांगण्यात आले. नेमकी कोणती कागदपत्रे सादर करायची, हे मात्र स्पष्ट करण्यात आले नसल्याचे सुरी यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांनी नंतर नागरिकत्वाचा पुरावा म्हणून पासपोर्ट सादर करण्यास सांगितल्याचेही सुरी यांनी सांगितले. आपल्याकडे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड याशिवाय इतर कागदपत्रेही असल्याचे त्यांनी नमूद केले.
तीन देशांमध्ये भारताचे राजदूत आणि उच्चायुक्त म्हणून काम केलेल्या व्यक्तीलाच SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकत्व सिद्ध करताना अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांना या प्रक्रियेत कोणत्या अडचणी येऊ शकतात, असा सवाल सुरी यांनी उपस्थित केला.
सुरी यांच्या याच अनुभवाचा आधार घेत चिदंबरम यांनी SIR प्रक्रियेच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचा त्यांचा आरोप असून, यामुळे मोठ्या संख्येने नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Mr Navdeep Suri, former Ambassador of India to Egypt and United Arab Emirates and former High Commissioner to Australia said on the S.I.R. process:
“If I have trouble establishing my citizenship after representing India in the three countries, what’s the fate of the common…
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) August 24, 2026


























































