
हिंदुस्थानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कोलंबो येथे दोन्ही उभय संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. शुभमन गिल याच्या नेतृत्वात हिंदुस्थानचा संघ श्रीलंकेशी दोन हात करत असताना, तर दुसरीकडे त्याची बहीण शहनील गिल एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
रियॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’चा दुसरा सिझन सुरू आहे. या शोमध्ये शहनील गिल सहभागी झाली असून खेळादरम्यान आतली माहिती लीक केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे. शहनीलने या प्रकरणाची तुलना थेट मॅच फिक्सिंगशी करत, दुसरी स्पर्धक पारुल गुलाटी हिच्यावर संशय व्यक्त केला आहे.
शहनीलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत शोच्या प्रॉडक्शन सिस्टीमचा खुलासा केला. शूटिंगदरम्यान प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेण्यासाठी प्रॉडक्शनकडून एक शॅडो अर्थात पर्सनल असिस्टंट दिला जातो. एका शॅडोला पैसे देऊन त्याच्या मार्फत शोमधील गुपिते आणि ट्रेटर्सची माहिती मिळवली जात होती, असा आरोप शहनीलने केला.
पारुल गुलाटी दररोज सकाळी एका नवीन ट्रेटरची अचूक ओळख पटवत होती. सुरुवातीला सर्व स्पर्धकांना तिच्या सिक्स सेन्सचा हेवा वाटत होता. मात्र अशी गट फिलिंग नक्की येते कुठून? नंतर समजले की या गट फिलिंगच्या मागचा स्त्रोत वेगळाच होता, असा टोला शहनीलने लगावला. तसेच विचार करा, तुम्ही ‘द ट्रेटर्स’मध्ये जाता आणि तिथे फक्त ट्रेटर्सच प्रामाणिकपणे गेम खेळत असतात. बाहेरील माहितीमुळे नियमानुसार आणि स्वतःच्या रणनीतीने खेळणाऱ्या प्रामाणिक स्पर्धकांवर मोठा अन्याय झाला आहे, असा आरोपही तिने केला.
View this post on Instagram
हा शो नक्की काय आहे?
करण जोहर होस्ट करत असलेल्या या शोमध्ये स्पर्धकांना इनोसन्स आणि ट्रेटर्स अशा दोन गटांत विभागले जाते. इनोसन्सना स्वतःचा बचाव करत ट्रेटर्सना शोधायचे असते, तर ट्रेटर्सना आपली ओळख लपवून इतरांना गेममधून बाहेर काढायचे असते. त्यामुळे आतली माहिती जर बाहेर येऊन कुणी मॅच फिक्सिंग करत असेल तर शोच्या मूळ गाभ्यालाच धक्का पोहोचत असल्याचा आरोप शहनीलने केला आहे.

























































