
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ठाकूर मॉलजवळ सापळा रचून काशिमीरा पोलिसांनी २८ ग्रॅम एमडी जप्त केले. या प्रकरणात अभिनेता रोहुल्ला मेहंदी याच्यासह त्याच्या एका साथीदाराला शूटिंग सेटवरून अटक करण्यात आली. जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे ५ लाख ६० हजार रुपये आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे यांना अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी रात्री ठाकूर मॉल परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या सापळ्यात काशिफ शेख रा. मालाड पूर्व हा २८ ग्रॅम एमडी डिलिव्हरीसाठी आला असता त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या चौकशीत अभिनेता रोहुल्ला मेहंदी याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मालाड येथील एका स्टुडिओत छापा टाकून रोहुल्ला याला अटक केली. रोहुल्ला मेहंदी याने बॉलिवूडमध्ये आणखी कोणाला अमली पदार्थ पुरवले होते का, या कथित ड्रग्ज नेटवर्कमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.





























































