
मी जर मेलो तर मग करा तुम्हाला काय करायचं ते. आपण इतकी वर्षे हा लढा लढत आलो आहोत आणि आता मागे हटायचं नाही. माझ्या जिवाची चिंता करून आंदोलनाची दिशा बदलू नका. २९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी पाटील भावनिक होत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे संघर्षाची तीव्रता आणि आंदोलनाबाबतची निर्णायक लढ्याची तयारी सुरू केली. २९ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गोदाकाठच्या १२३ गावांतील मराठा समाजबांधवांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत संवाद साधला.
या बैठकीत संबोधित करताना मनोज जरांगे पाटील काहीसे भावुक झाल्याचे पहायला मिळाले. या बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टचे आंदोलन हे केवळ आणखी एक आंदोलन नसून मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याचा ८, निर्णायक टप्पा असल्याचे स्पष्ट केले. हे आंदोलन शेवटचे आणि निर्णायक असेल, असे सांगत त्यांनी समाजबांधवांना आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले. आंदोलनाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाने आणि प्रत्येक कुटुंबाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मला प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक हवा आहे. आंदोलनाच्या ठिकाणी संध्याकाळ सकाळ-प्रत्येक घरातून भाकरी पोहोचली पाहिजे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टँकरची जबाबदारी ठरवण्यात आली. तसेच आंदोलनस्थळी वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्यावर देखील त्यांनी भर दिला. डॉक्टरांची स्वतंत्र टीम तैनात ठेवा. आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केल्या पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आंदोलन दीर्घकाळ चालल्यास कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये. ५८ लाख नोंदीचे प्रमाणपत्र आणि सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय सरकारला सुटी नाही आणि एक मिनिटाचा ही वेळ देणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. ५८ लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र, सातारा, औंध, पुणे, कोल्हापूर आणि बॉम्बे गॅझेट यासह इतर सर्व मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी केल्याशिवाय सरकारला सुटी नाही. सरकारला त्या दिवशी एक मिनिटाचाही वेळ देणार नाही. येत्या २९ ऑगस्टला लाखोंच्या संख्येने मराठा समाज आंतरवाली सराटीत येणार असून, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी समाजबांधवांना दिले. आपला लढा न्यायाचा आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा धिंगाणा किंवा तोडफोड होता कामा नये, असे ते म्हणाले.
मराठा समाज समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईमध्ये देखील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, आज मराठा समाज समन्वयकांकडून आझाद मैदानाची देखील पाहाणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा देखील इशारा दिल्यामुळे आता हे आंदोलन नेमकं कुठे होणार? मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईत जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.




























































