
कारागृहात विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी ‘लाडक्या बहिणीं’साठी राख्या बनवल्या आहेत. रंगीबेरंगी आणि आकर्षक अशा राख्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. कारागृह प्रशासनाने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने महिला व पुरुष कैद्यांना राखी बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांखालील तब्बल ३ हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये जवळपास दीड हजार महिला कैदी आहेत. शिक्षेसोबतच कैद्यांच्या सुधारणेसाठी येथे विविध उपक्रम राबवले जातात. कारागृहातील बंद्यांना केवळ शिक्षा भोगण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यातील कौशल्याला वाव देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यावर कारागृह विभागाचा भर आहे. यामधील पुरुष कैद्यांना राखी बनवण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेले. त्यानुसार जवळपास साडेचार हजार राख्या कैद्यांनी तयार केल्या आहेत. अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या प्रेरणेने आणि कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी नागरिकांना या विक्री केंद्राला आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले आहे.
मिळणारा नफा थेट कैद्यांच्या बँक खात्यात
या राख्या बनवण्यासाठी रेशमी धागे, मणी आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. कैद्यांनी बनवलेल्या या राख्यांची विक्री कारागृहाबाहेरील स्टॉलवर सर्वसामान्यांसाठी करण्यात येत आहे. यातून मिळणारा नफा थेट कैद्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
स्वावलंबी जीवनासाठी उपक्रम
कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी जीवन जगण्यासाठी असे उपक्रम राबवण्यात येत असून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र जुन्या आरटीओ कार्यालय येथे सुरू करण्यात आले आहे. केवळ खरेदीच्या उद्देशाने नव्हे तर बंदींना प्रोत्साहन देण्यासाठी या विक्री केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





























































