
काळाचौकी येथील अभ्युदय नगरचा समूह पुनर्विकास करू पाहणाऱ्या म्हाडाच्या धोरणांबाबत रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. शिवसेना कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता अभ्युदय नगरमधील रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. काळाचौकी येथील अभ्युदय नगरमध्ये सुमारे 15 हजार रहिवासी राहतात. अभ्युदय नगर गृहनिर्माण संस्थेचे 3410 सभासद आहेत. हक्काचे घर आणि सुरक्षित भवितव्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. पुनर्विकासात पारदर्शकता असावी, आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळावी आणि रहिवाशांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे, अशा भावना त्यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.
या वेळी रहिवाशांसोबत शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव व लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, आशीष चेंबूरकर आदी उपस्थित होते.
लवकरच विशेष बैठक बोलावणार
अभ्युदय नगरच्या रहिवाशांवर म्हाडाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शिवसेना आवाज उठवेल असे आश्वासन देतानाच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच यासंदर्भात अभ्युदय नगरमधील रहिवाशांची भेट घेऊन एक विशेष बैठक आयोजित केली जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर अभ्युदय नगरमधील रहिवाशांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.





























































