सुट्या तेलाच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची मागणी, तुकाराम मुंढे यांच्या विरोधात व्यापारी उतरणार रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरीविरोधात धडाकेबाज कारवाई करणारे तुकाराम मुंढे यांना प्रथमच मोठा विरोध झाला आहे. सुटय़ा तेलावरील बंदीवरून व्यापाऱयांनी मुंढे यांच्या विरोधात बाह्या सरसावल्या आहेत. ही बंदी 15 दिवसांत उठवा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा व्यापाऱयांनी सरकारला दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छाप्यांमध्ये तेलांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी सुटय़ा तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली. या तेलाची विक्री करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांची शिक्षा आणि 3 ते 10 लाखांपर्यंत दंडही होऊ शकतो, असे त्यांनी बजावले होते. सुटे तेल घेऊ नका, असे आवाहन मुंढे यांनी केले होते. त्यांच्या या निर्णयाला व्यापाऱयांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

आम्ही अतिरेकी आहोत का?

नाशिकमध्ये आज व्यापाऱ्यांची बैठक झाली. कारावास आणि दंडाची धमकी देणे हे अन्यायकारक आहे. आम्ही अतिरेकी आहोत का, असा संताप व्यापाऱयांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यातील व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू, असा इशारा व्यापाऱयांनी दिला.

गावखेड्यात कष्टकऱ्यांचे हाल

सुटय़ा तेलावरील बंदीमुळे गावखेड्यात गरीब, कष्टकऱयांचे हाल होत आहेत. मोठय़ा शहरांमध्ये सर्वसाधारपणे लोक रिफाइन्ड तेल वापरतात. मात्र गावखेडय़ात अनेक कुटुंबे रोजच्या रोज सुटे तेल घेतात. तेव्हा त्यांचे जेवण बनते. या तेलावरील बंदीमुळे दोनच दिवसांत त्यांचे हाल झाले आहेत. अनेक लोकांना तालुक्याच्या ठिकाणी तेल न मिळाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. सुटे तेल बंद करायचे असेल तर पिशवीबंद तेलाचे दर कमी करा, अशी मागणी लोकांनी केली आहे.