
पुण्यात झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन-झींसोबत संवाद साधला. मात्र या कार्यक्रमात युवकांच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी राजकीय व व्यक्तिगत प्रश्नोत्तरे झाली. फडणवीसांच्या व क्रिकेटपटूंच्या राजकीय प्रवासाचे कौतुक इतकेच या सोहळ्याचे स्वरूप होते. त्यावरून सोशल मीडियात भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
‘जंतरमंतर’वरील कॉक्रोच आंदोलन, देशभरात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आणि राहुल गांधी यांच्या झंझावाताचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने धसका घेतला आहे. भाजपचे नेते आता तरुणांचे मेळावे घेऊ लागले आहेत. फडणवीसांनी आज ‘मंथन फॉर युवा’ कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमात व्यासपीठावर एकही तरुण नव्हता. युवकांच्या प्रश्नांची साधी चर्चाही झाली नाही. अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेली स्वतःच्या राजकीय प्रवासाची वर्णने फडणवीसांनी पुन्हा रंगवून सांगितली. त्याचे प्रतिबिंब तत्काळ सोशल मीडियात उमटले व कार्यक्रमाची खिल्ली उडवली गेली.
नेटकरी म्हणतात…
नेमका कसला कार्यक्रम होता? राजकीय सभेसाठी क्रिकेटपटूंना आणायचं आणि त्याला जेन-झी, जेन-अल्फा मेळावा असं नाव द्यायचं! कितीही लपवलं तरी ते लपत नव्हतं.
जेन-झींना जे हवे, ते फडणवीसांमध्ये नाही…
संपूर्ण कार्यक्रमच कोलमडला. छात्रांवर एकही शब्द नाही. फक्त टरबुज गोड की आंबट यावर चर्चा.
राज्य सरकारच्या पैशाने झालेला अपयशी पब्लिसिटी स्टंट.
हे किती पैसे देऊन आणलेत, अशी काय क्रांती केलीय त्यांनी तरुण जमा व्हायला.
ये डर जरुरी था…
काय आहे तेच समजत नाही नागपूरचा कार्यक्रम आहे की सभा, की मुलाखत. सगळा गोंधळ दिसतोय. वाया गेला खर्च.
नक्कल करायलाही अक्कल लागते – हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांच्या कार्यक्रमावर खोचक टीका केली. ‘राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला आहे. नागपुरातील जेन-झी संवाद कार्यक्रम सुपरफ्लॉप ठरला आहे. नक्कल करायलाही अक्कल लागते,’ असा टोला सपकाळ यांनी हाणला. ‘राहुल गांधींची वाढती लोकप्रियता आणि तरुणाईचा मिळणारा प्रतिसाद भाजपला अस्वस्थ करत आहे. त्यामुळे ‘छात्रों की गूँज’ची नक्कल करण्यापासून ते राहुल गांधींवर खोटे आरोप करण्यापर्यंत भाजपकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि फडणवीसांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद यातील फरक स्पष्ट झाला आहे, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले.






























































