आयुष्यभर भीक मागून उदरनिर्वाह, मृत्यूनंतर घरी सापडली 30 पोत्यांमध्ये भरलेली लाखांची रोकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष्यभर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेच्या घरात लाखो रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. हूर असे मयत महिलेचे नाव असून वृद्धापकाळाने तिचा रविवारी मृत्यू झाला. हूरच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी तिच्या मांड्या येथील राहत्या घराची पाहणी केली असता 30 हून अधिक पोत्यांमध्ये भरलेली 8.40 लाखांची रोकड सापडली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हूरच्या घरी 30 हून अधिक पोत्यांमध्ये भरलेली हजारो नाणी आणि 10, 20 व 50 रुपयांच्या नोटा सापडल्या. पैसे मोजल्यानंतर एकूण रक्कम 8,40,000 रुपये इतकी होती. ही रक्कम महिलेच्या भावांकडे सोपवण्यात आली.

स्थानिक लोक तिचे सामान तपासताना आणि पैसे मोजतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हूर एका भाड्याच्या घरात आपल्या बहिणीसोबत राहत होती. बहिणीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. दोघींपैकी कोणीही लग्न केले नव्हते.