
राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील खराब हवामान आणि येथील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे लोकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. मात्र, या अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे 2 आंतरराष्ट्रीय विमानांसह एकूण 14 विमानांचे मार्ग बदलावे लागले. यापैकी 11 विमाने जयपूरला, 2 चंदीगडला आणि 1 लखनौला वळवण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने दिल्लीच्या जवळपास सर्व भागांसाठी तात्काळ रेड अलर्ट जारी केला आहे
खराब हवामानामुळे विमानसेवांवर परिणाम झाल्याने, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (DIAL) ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे. दिल्ली विमानतळाच्या अधिकृत सूचनेनुसार, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात खराब हवामान कायम आहे. तथापि, दिल्ली विमानतळावरील विमानसेवा सध्या सामान्यपणे सुरू आहे. प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि निर्विघ्नपणे व्हावा यासाठी आमचे स्थानिक पथक सर्व विमान कंपन्या आणि संबंधित घटकांसोबत मिळून काम करत आहे. प्रवाशांना विनंती आहे की, विमानांच्या अद्ययावत स्थितीसाठी त्यांनी आपापल्या विमान कंपन्यांच्या संपर्कात राहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने मध्य दिल्ली, नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण-पूर्व दिल्ली, शाहदरा, उत्तर-पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली, नैऋत्य दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि वायव्य दिल्लीसह दिल्लीच्या सर्व प्रमुख भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एनसीआरमधील फरिदाबाद, गाझियाबाद, गुरुग्राम आणि नोएडासाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक मंदावली असल्याचे वृत्त आहे. हवामान विभाग आणि प्रशासनाने लोकांना पाणी साचलेले रस्ते टाळण्याचा, तसेच विमान प्रवाशांना विमानतळाकडे लवकर निघून आपल्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.



























































