घाम फुटला, जीभ अडखळू लागली; ’56 इंच’चे गृहस्थ पत्रकारांच्या प्रश्नाला घाबरतात, काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे हिंदुस्थानातील राजदूत सर्जियो गोर यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीबद्दल मोठा दावा केला. फ्रान्ममधील जी-7 परिषदेतील बैठकीनंतर मोदींना पत्रकारांशी संवाद साधायचा नव्हता, असे गोर म्हणाले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याचाच आधार घेत काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

फ्रान्समधील एवायां-ले-बाँ येथे जी-7 शिखर परिषदेदरम्यान मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. या भेटीपूर्वी हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन अधिकाऱ्यांना विनंती केली होती की, माध्यमांना फक्त बैठकीचे फुटेज आणि सुरुवातीची वक्तव्ये घेण्यासाठी परवानगी द्यावी, परंतु पत्रकारांना कोणतेही प्रश्न विचारू देऊ नयेत. असा दावा सर्जियो गोर यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला ही विनंती मान्य केली, मात्र बैठक सुरू झाल्यावर सुरुवातीचे वक्तव्य संपताच त्यांनी कॅमेऱ्यांकडे पाहून काही प्रश्न आहेत का? असे विचारले. ट्रम्प यांच्या या प्रश्नामुळे ठरलेला जवळपास 45 मिनिटांची पत्रकार परिषद झाली. गोर यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने मोदींवर हल्ला चढवला.

मोदींना प्रश्नांची किती भीती वाटते याचा पुरावा पाहा. अमेरिकेचे राजदूत म्हणाले, फ्रान्समधील जी-7 शिखर परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांना भेटणार होते. या भेटीपूर्वी, हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न घेऊ नयेत अशी विनंती केली होती. याचा अर्थ असा की, ’56 इंच’चे हे गृहस्थ पत्रकारांच्या प्रश्नांना इतके घाबरतात की ते भेटीपूर्वी विनवणी करत आहेत, कृपया कोणतेही प्रश्न विचारू नका. याच भीतीमुळे मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. एकदा, अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा त्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांना घाम फुटला आणि त्यांची जीभ अडखळू लागली, असा टोला काँग्रेसने लगावला.

नरेंद्र मोदींनी काय म्हटलं ते ट्रम्प विसरले नाहीत; त्यांनी फक्त ते गांभीर्याने ऐकलं नाही. ज्यांच्यावर तडजोडीची छाप उमटला आहे, अशा पंतप्रधानांना गांभीर्याने घेतलं जात नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानची जी अवस्था झाली आहे, ती पाहणं वेदनादायक आहे. एकेकाळी हिंदुस्थान एक प्रभावशाली आणि सामर्थ्यशाली देश होता. आज मात्र हिंदुस्थानला गृहीत धरलं जात आहे, असा टोला खेरा यांनी लगावला.