कुटुंबाला संपवल्यानंतर मारेकऱ्यांनी जेवण, अंघोळ आणि ड्रग्ज घेतले; बांगलादेशातील हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशातील हिंदु कुटुंबाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुटुंबाला संपवल्यानंतर मारेकऱ्यांनी तिथेच जेवण केले, अंघोळ केली. मग अंमली पदार्थांचे सेवन केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सिद्धार्थ दास (19) आणि मुग्धा दास (23) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुग्धा आणि सिद्धार्थ हे गुरुवारी रात्री उशिरा ड्रग्जचे सेवन करण्यासाठी चक्रवर्ती कुटुंबाच्या दुमजली घराच्या छतावर चढले होते. वरून आवाज ऐकू आल्यावर गणपती चक्रवर्ती तिथे पाहण्यासाठी गेले. संशयितांनी चक्रवर्ती यांच्याकडील टॉवेलचा वापर करून त्यांचा गळा आवळला. गोंधळ ऐकून चक्रवर्ती यांची पत्नीही त्यांच्या मागोमाग छताकडे गेली असता तिचीही हत्या करण्यात आली.

काय चाललंय पाहण्यासाठी खोलीतून बाहेर आलेल्या या जोडप्याच्या मुलीवरही संशयितांनी हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनी काही मिनिटे तिच्याशी झटापट केली आणि शेवटी दोरीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी 12 वर्षांच्या मुलाचीही हत्या केली. हत्येनंतर ज्वलनशील पदार्थाचा वापर करून त्यांचे चेहरे जाळण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

हत्येनंतरही दोघेही आरोपी रात्रभर घरातच थांबले होते. दुसऱ्या दिवशी नमाजच्या वेळी रस्त्यावर कमी वर्दळ असताना आरोपी तेथून निघून गेले, असे पोलीस आयुक्त माबुद यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तिथे अंघोळ केली आणि कुटुंबाच्या रेफ्रिजरेटरमधील खजूर व काकडी काढून खाल्ली. त्यानंतर त्यांनी घरात एका टेबलावर सापडलेले अमली पदार्थ सेवन केले.

घटनास्थळाहून जाण्यापूर्वी तपासात दिशाभूल करण्यासाठी त्यांनी कपाटे व ड्रॉअर्स उघडले आणि कपडे व इतर वस्तू सर्वत्र विखुरल्या. त्यांनी पीडितांच्या घरातून सोन्याचे दागिनेही लुटले आणि कुटुंबाचे दोन मोबाईल फोन डिटर्जंट मिश्रित पाण्यात बुडवून नष्ट केले. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिद्धार्थ आणि मुग्धा यांना अटक केली असून, त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. पीडितांच्या घरातून लुटलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.